Santosh Deshmukh’s Sister Priyanka Chaudhari in Jan Akrosha Morcha in Mumbai : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही एक आरोपी फरार आहे. तसंच, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी झालेली नाही. या कारणांमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला आहे. मुंबई मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असून यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे सदस्यांसहित संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. आज पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या भगिनी प्रियांका चौधरी यांनीही या मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी टीव्ही ९ मराठीशी त्यांनी संवाद साधत संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
संतोष देशमुख यांच्या बहिणी प्रियांका चौधरी म्हणाल्या, “योग्य रितीने तपास होत असता तर आरोपी पकडला गेला असता. आता दोन महिने झाले तरी एक आरोपी पकडला जात नाहीय. त्यामुळे आता प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. मुलांचं काय होणार पुढे? ते पुढे शिकतील की नाही? वैभवीची परीक्षा जवळ आली आहे. नेमकं काय करावं हे माझ्या कुटुंबाला कळत नाहीय. माझी धाकटी वहिनी अॅडमिट आहे. लहान भाऊ सलाईन लावून मोर्चा करतोय. का बरं दखल घेत नाही”, असा सवाल त्यांनी विचारलाय.
आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्यावी
त्या पुढे म्हणाल्या, “या बहिणीची सरकारला कळकळीची विनंती आहे. लवकरात लवकर आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्यावी. जर माझ्या लहान भावालाही काहीतरी झालं तर कुटुंब कसं चालणार? माझे आई वडील म्हातारे आहेत. मीही आजारी असते. माझं रक्त कमी आहे, व्हिटॅमिन कमी आहेत. पण चिमुकले मोर्चात फिरायला लागले, म्हणून मी आले.”
त्याने आम्हाला आनंदी जगायला शिकवलं
“पाच महिन्यांपूर्वी एकदा भाऊ पुण्याला आला होता. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या आजारपणाबद्दल मी त्याला म्हणाले तेव्हा त्याने मला बाहेर रस्त्यावर राहणारे लोकलही कसे आनंदी राहतात हे दाखवलं. तो राजा होता आणि देवमाणूस होता. तो आनंदी कसं राहायचं हे शिकवत होता. त्याच्या एका वाक्यानेच मी झोपेतून उठायचे. त्यामुळे त्याच्या मुलांकडे पाहून तरी सरकारने आरोपीला पकडावं. त्या मुलांचं खूप वाईट वाटतंय”, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
शिष्टमंडळ आज भेट घेणार
जनआक्रोश मोर्चातील आंदोलकांचे एक शिष्टमंडल आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा अशी मागणी केली जाणार आहे. तसंच, पुढील आंदोलनाची दिशाही आज ठरवण्यात येणार आहे.