मुंबईत अस्सल मराठमोळे पदार्थ कुठे मिळतील, असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर त्याचं उत्तर सोप्पं आहे. गोरेगाव पश्चिमेला असलेले ‘सप्रे – टेस्टी कल्चर’. हे उपाहारगृह मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीचे गेली कित्येक वर्षे प्रतिनिधित्व करत आहे. श्रीखंडाची वडी ही त्यांची पारंपरिक खासियत. याव्यतिरिक्त विविध प्रकारची पक्वान्नं आणि पेयंही इथे मिळतात. चला तर मग मराठमोळ्या मेजवानीचा आस्वाद घेऊ या..
अस्सल मराठमोळे पदार्थ बनवून खवय्यांना तृप्त करणाऱ्या ‘सप्रे- टेस्टी कल्चर’चा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला ५० वष्रे मागे जावे लागते. १९७० साली महादेव सप्रे यांनी हे दुकान सुरू केले आणि वर्षांगणिक त्यांची प्रगती होत गेली; पण मराठमोळ्या पदार्थाचे विक्रेते एवढीच त्यांची ओळख नाही. महादेव यांनी मुंबईला आणखीन एक महत्त्वपूर्ण देणगी दिलेली आहे. ती म्हणजे श्रीखंड वडी. पिवळी श्रीखंडाची गोळी हल्ली सर्रास सगळीकडे मिळते; पण श्रीखंड वडी बनवण्याची संकल्पना आपल्या वडिलांची असल्याचा दावा त्यांचे पुत्र अनिल सप्रे करतात. साधारण १९६०-७० या दशकभराच्या काळात महादेव सप्रे हे गिरगाव, दादर, विलेपाल्रे, गोरेगाव या परिसरांत दारोदारी जाऊन चार आण्याला एक या दराने श्रीखंड वडी विकत. चौकोनी आणि पिवळसर रंगाची, चकाकणारी श्रीखंड वडी हीच सप्रे यांची खरी ओळख! आजही त्यांच्याव्यतिरिक्त ही वडी कोणीच तयार करत नाही.
तुमचा विश्वास बसणार नाही; पण तब्बल १६५ प्रकारचे पदार्थ सप्रेंकडे मिळतात. अल्पोपाहारामध्ये अळू वडी, कोिथबीर वडी, बटाटावडा, मिसळ, थालीपीठ, हराभरा पनीर वडा, साबुदाणा पुरी यासोबत आणखी २० प्रकारचे मराठी पदार्थ तुम्हाला येथे मिळतील. इडली सांबार, वडा सांबार या पदार्थाना सध्या खूप मागणी आहे, पण ते सगळीकडेच मिळतं म्हणून आम्ही ते ठेवत नाही, असे सप्रे सांगतात. उपवासाचे पदार्थही वर्षभर असतात. फक्त खमंग काकडी आणि बटाटय़ाची भाजी संकष्टीलाच असते. त्याशिवाय खरवस, गुलाबजाम, गाजर हलवा, दुधी हलवा, पुरणपोळी, शिरा यांची चवही खास असते. कोकम, आवळा सरबत, कैरी पन्हे, पीयूष, तसेच केवळ आंब्याच्या हंगामात मिळणारे आंबा पीयूष हीदेखील त्यांची खासियत आहे. मुख्य म्हणजे हे सर्व गोड पदार्थ आणि सर्व पेये सप्रे स्वत: बनवतात.
संक्रांतीच्या काळात त्यांच्याकडे तिळाचे लाडू, गुळपोळी, तिळाच्या वडय़ा आणि हलवा मिळतो, तर तेलपोळी आणि पुरणपोळीही वर्षभर मिळते. विविध प्रकारचे लाडू, पेढे आणि बर्फी ते स्वत: बनवतात. जितकी साखर कमी तितका पेढा महाग आणि चविष्ट, असं सप्रे सांगतात. त्यामुळे त्यांच्या सर्वात महाग राजकोट पेढय़ाला सर्वाधिक मागणी असते. तो महाग असला तरी तोंडात टाकल्यावर सहज विरघळतो. हा पेढा एकदा तरी चाखावा असाच आहे. याव्यतिरिक्त बर्फीमध्ये पिस्ता, मावा, चॉकलेट, अंजीर, मलई हे प्रकार मिळतात. लाडूमध्ये िडक, मेथी, मेथी मिक्स, बेसन, रवा, मोतीचूर लाडू आहेत. पारशी डेरीमध्ये मिळणारा नरम पेढाही ते स्वत: तयार करतात.
दिवाळीच्या फराळाचेही जवळपास २०-२५ प्रकार येथे मिळतात. दुकान आणि हॉटेल असतानाही लहान-मोठय़ा समारंभाच्या ऑर्डरही येथे घेतल्या जातात. येथील दरही सामान्य माणसांना परवडतील असेच आहेत. स्वच्छता आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींवर त्यांचा सर्वाधिक भर असतो आणि त्याच्या जोरावरच आजवरची वाटचाल केली असल्याचं सप्रे सांगतात. म्हणूनच दहिसर ते वांद्रेपासून खवय्ये येथे अस्सल मराठी पदार्थ खायला येतात. त्यामध्ये अनेक कलाकार आणि राजकीय मंडळींचाही समावेश आहे.
संजीव कपूर खूश
सप्रेंची आणखी एक ओळख म्हणजे दही घातलेली चटणी. तिची ख्याती इतकी आहे की, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर ती चाखण्यासाठी वर्षभरापूर्वी सप्रेंचा पत्ता शोधत त्यांच्याकडे पोहोचले होते. तिथे गेल्यावर केवळ चटणीच नाही, तर सर्व मराठी पदार्थाची चव घेऊन ते उत्तम असल्याची पावतीही त्यांनी दिली होती.
सप्रे – टेस्टी कल्चर
कुठे ? ६/७, तळमजला, जयकर स्मृती, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२.
कधी ? सोमवार ते रविवार
सकाळी ८.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत.