शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश यांच्यापासून आपण गर्भवती राहिल्याची बतावणी करत सरनाईक पिता-पुत्रांना सुमारे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या मेरी लुईस आणि तिचा पती संजीत शर्मा या दोघांविरोधात वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. युवा सेनेत काम करण्याची आपली इच्छा आहे, असे सांगत मेरी हिने पूर्वेश यांची मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सोफीटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली होती. या भेटीनंतर मेरी आणि तिच्या पतीकडून ब्लॅकमेिलग सुरू झाल्याची तक्रार पूर्वेश यांनी नोंदवली आहे.  या प्रकरणी अद्याप शर्मा पती-पत्नींना अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेरी लुईस आणि पूर्वेश सरनाईक यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. आपण ऑस्ट्रेलियाचे नागरिक असल्याचे मेरी हिने पूर्वेश यांना ओळख करून देताना सांगितले. तसेच युवा सेनेत काम करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली. त्यानुसार मे महिन्यात मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सोफीटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये मेरीने पूर्वेश यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तिने पूर्वेश यांच्याकडून थेट एक कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशी धमकीही त्यांनी दिली. याशिवाय मेरी लुईस आणि तिचा पती संजीत शर्मा यांनी पूर्वेश यांच्या छायाचित्राचा गैरवापर करत ‘प्रतिपा सरनाईक’ नावाने खोटे फेसबुक खातेही तयार केले. फेसबुकवरून पूर्वेश यांच्या मित्रांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आली.
पूर्वेश याने मेरीकडून आलेली खंडणीची धमकी उडवून लावताना तिला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सरनाईक कुटुंबाची बदनामी करू, अशी धमकी तिने दिली. मात्र, पूर्वेश या धमकीलाही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून मेरी आणि तिचा पती संजीत शर्मा या दोघांनी पूर्वेश यांचे वडील आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक विहंग यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला. ‘एक कोटी रुपये दिले नाहीत तर, पूर्वेश यांच्याकडून मेरी गर्भवती राहिली, अशी बदनामी आम्ही करू’, अशी धमकी आमदार सरनाईक यांना त्यांनी दिली. तसेच मेरी ही पूर्वेश यांची मैत्रीण असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

Story img Loader