‘सर्वकार्येषु सर्वदा’चे यंदा अकरावे पर्व

मुंबई : व्रतस्थ वृत्तीने विधायक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ देणारा ‘लोकसत्ता’चा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रम उद्या, शुक्रवारी गणेश चतुर्थीपासून सुरू होत आहे.

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे हे अकरावे वर्ष. विविध क्षेत्रांत प्रकाशवाटा दाखविणाऱ्या संस्थांना पाठबळ देणे हे आपले कर्तव्य समजून ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम हाती घेतला. विधायक कार्यात आपलाही हातभार लागावा, याची जाणीव बाळगणारे लाखो दानशूर आणि सेवाव्रती संस्था यांच्यात ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाद्वारे दानरूपी सेतू तयार केला आहे.

गेल्या दहा वर्षांत या उपक्रमाद्वारे दानशूरांनी १०२ संस्थांना मदतीचा हात दिला. यंदाही विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या दहा संस्थांचा परिचय या उपक्रमाद्वारे करून देण्यात येणार आहे. आपापल्या क्षेत्रातील उणिवा हेरून त्या दूर करण्यासाठी नेटाने उभ्या राहिलेल्या या संस्था. विधायक कार्याचा वसा घेऊन काम करणाऱ्या संस्थांना पाठबळ देणे, हे आपले सर्वाचे काम. गेली दहा वर्षे ते दानशूर-वाचकांनी चोखपणे बजावले. गेल्या वर्षी करोनाकाळातही दात्यांनी सेवाव्रतींना सढळ हस्ते मदतीचा हात दिला. यंदाही या संस्थांना भक्कम पाठबळ मिळेल, अशी खात्री आहे.

ऑनलाइन देणगीचीसुविधा..

यंदाही दि कॉसमॉस को-ऑप. बँकलि. ही या उपक्रमाची बँकिंग पार्टनर आहे. या उपक्रमातील संस्थांसाठी ऑनलाइन देणगीची सुविधा ‘कॉसमॉस’मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देश-विदेशातील दानशूरांना त्याचा लाभ घेता येईल. याबाबतचा तपशील संस्थांच्या परिचयाबरोबर देण्यात येईल.

बँकिंग पार्टनर : दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.