राज्यातील ५१ संस्थांच्या प्रतिनिधींचा स्नेहमेळावा; दहा संस्थांना धनादेशांचे वितरण
समाजात देणाऱ्यांचे हात हजारो असतात. त्यामुळे विधायक कार्यासाठी ज्यांना निधीची गरज आहे, अशा संस्थांना देणगीच्या रूपाने नवी उमेद मिळते. यातूनच मग समाजातील प्रत्येक वंचित घटकांच्या विकासासाठी ज्ञान-कर्म यज्ञ अखंड प्रज्वलित राहतो. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून गणेशोत्सवाच्या मंगलपर्वादरम्यान अशा कर्मरुपी ज्योतींचा परिचय करून देण्यात येतो. त्यांच्या कार्याला उभारी मिळावी म्हणून लक्षावधी वाचकांच्या साहय़ाने दानयज्ञ भरविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे पाचवे वर्ष. या कालावधीमध्ये समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या अशा ५१ सामाजिक संस्था आणि समाजात सकारात्मक काही घडते त्यात आपलाही वाटा असावा असे वाटणारे लक्षावधी वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले आहे.
यंदा या उपक्रमाच्या पाचव्या वर्षांच्या निमित्ताने या सर्व संस्थांच्या स्नेहमीलनाचा तसेच या वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संस्थांना मिळालेल्या धनादेशाच्या वितरणाचा सोहळा येत्या मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दादरच्या सावरकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास आपल्या सामाजिक जाणिवेसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात येणार आहे.
‘सर्वकार्येषु सर्वदा’
पुस्तकाचे प्रकाशन
सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमास यंदा पाच वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने या उपक्रमातील सर्व संस्थांच्या कार्याचा पुनर्परिचय वाचकांना करून देण्याच्या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या शीर्षकानेच या पुस्तकाचे प्रकाशनही मंगळवारी होणाऱ्या स्नेहमेळाव्यात करण्यात येणार आहे.
‘लोकसत्ता ग्रंथमाले’तील या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पुण्यातील डायमंड पब्लिकेशन्स. कार्यक्रमाच्या ठिकाणी हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची माहिती वाचकांना एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी या उद्देशाने काढण्यात आलेल्या या पुस्तकामध्ये ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातील ५१ संस्थांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा