‘ससून डॉक आर्ट फेस्टिव्हल’ हा मुंबईत मासळीच्या नौका जिथे येतात, त्या कुलाब्याच्या ससून गोदीतला कला-उत्सव. तिथं सुमारे ३० कलावंतांच्या किंवा समूहांच्या कलाकृती पाहायला मिळतील. काही कलाकृती विनाकारण शोभिवंत वाटतील. गॅलऱ्यांमधली कलाच पाहण्याची सवय असणाऱ्यांना तर ‘हे काय मॉलमधल्या चित्रांसारखं?’ असंही काही वेळा वाटेल, हे सारं खरं.. पण तरीही, ससून डॉकबद्दल किंवा एका शहरातल्या सुमारे १४० र्वष जुन्या मासळी-बंदराबद्दल कलावंतांना काय काय वाटतं, हे समजून घेण्यासाठी आणि अर्थातच ससून डॉक पाहण्यासाठी, इथं अगदी बच्चेकंपनीसह गेलंच पाहिजे!

मुंबईत सध्या एखादा अख्खा दिवस बाहेर काढता येईल, एवढी प्रदर्शनं आहेत. मुलांना दाखवलीच पाहिजेत अशी यापैकी दोन.. पहिलं ८५ रुपयांचं तिकीट काढूनसुद्धा पाहावंच असं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातलं (रीगलसमोरचं जुनं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) ‘देश-परदेश’ या नावाचं प्रदर्शन. ‘ब्रिटिश म्युझियम’मधून खास मुंबईतच आलेल्या कलावस्तूंसह इथं देशभरातल्या अन्य संग्रहालयांतल्या दुर्मीळ कलावस्तूसुद्धा आणवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुलांनी-मोठय़ांनी हे प्रदर्शन पाहिलंच पाहिजे. दुसरं प्रदर्शन मात्र ‘ससून डॉक’मधलं. बसनं गेलात तर ससून गोदीच्या थांब्यापासनं जरा आत चालावं लागतं. मासळीचा वास नाकात शिरतो, मुरतो तेव्हाच ‘बर्फ कारखान्या’च्या भिंतींवरती जवळपास ३५० चेहऱ्यांचे फोटो लावलेले दिसू लागतात. ही मूळ कल्पना ‘जेआर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रेंच कलावंताची. हा  ‘इनसाइड आऊट प्रोजेक्ट’ इथे आणणारे अक्षत नौटियाल आणि प्रणव गोहिल हेच या ‘ससून डॉक आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजकही आहेत.

मुंबईत एरवी ज्यांच्या कलाकृती दिसू शकतात असे कलावंत इथं नाहीतच. त्याऐवजी शहरांमधल्या सार्वजनिक जागांवर कशा कलाकृती करायच्या, याचा पक्का अनुभव असलेले अनेक विदेशी आणि देशी कलावंत आहेत. ससून डॉक परिसरातल्या एखाद्या वास्तूचं तरी ‘नूतनीकरण’ व्हावं, तिथं आपापल्या वाहनांनी येणाऱ्या लोकांना छान खातापिता यावं, असं वाटणारा एक फ्रेंच कलावंतही इथं आहे.. म्हणजे, ससून गोदी ही सध्या काही हजार लोकांच्या रोजगाराची जागा आहे आणि ती खरं तर त्या पद्धतीनंच वाढायला हवी, तिथे आज ज्या इमारती मोकळ्या आहेत तिथं मासळी-प्रक्रिया सुविधा नव्यानं सुरू व्हायला हवी, हे गेलं कुठल्या कुठे.. तरीही, ससून गोदीतल्या किंवा अन्य ठिकाणच्या मच्छीमारांचा जीवनसंघर्ष टिपणाऱ्या कलाकृतीदेखील इथं असल्यामुळे हा ‘फेस्टिव्हल’ जरूर पाहावा. मुलाबाळांसह पाहणार असाल, तर या फेस्टिव्हलखेरीज- बाकीचा ससून गोदीचा परिसरसुद्धा आपापल्या मुलांना आवर्जून दाखवावा.

पोलंड-मैत्रीतला अर्थ

भारत आणि पोलंड यांचं सहकार्य १९५० च्या दशकापासूनचं आहे. महाराष्ट्रातल्या कोराडीसह अनेक वीजनिर्मिती प्रकल्प, अनेक पूल पोलंडच्या सहकार्यानं बांधले गेले. पं. नेहरू यांचं पोलंडमध्ये प्रचंड स्वागत झालं होतं.. वगैरे इतिहासाला उजाळा देता देताच पोलिश पर्यटक व भारतीय लोक यांच्या मैत्रीतून फुललेल्या अर्थकारणाची गोष्टही सांगणारं एक प्रदर्शन सध्या ‘क्लार्क हाऊस’ इथं भरलेलं आहे. रीगल सिनेमासमोरच्या ‘सहकारी भांडार रेस्टॉरंट’च्या समोरचा रस्ता (नाथालाल पारेख मार्ग) फक्त ओलांडला की दिसणारं ‘क्लार्क हाऊस’ ही कलावंतांच्या एका समूहाची प्रयोगशाळा. त्यामुळेच, पोलंडमधील कलावंतांनी भरवलेल्या या प्रदर्शनात रूढार्थानं ‘कलाकृती’ दिसणार नाहीत; पण १९७० आणि १९८० च्या दशकात ज्याला ‘स्मगलिंग’ म्हणत, ते पोलिश आणि भारतीय लोकांच्या मैत्रीमधून कसं वाढलं होतं, याची गोष्ट इथं काही वस्तू, काही व्हिडीओपट आणि काही माहितीफलक यातून उलगडते आहे.

‘स्मगलिंग’ वाढण्यामागे भारतीय आणि पोलिश या दोघांच्याही वाढत्या गरजा भागवण्याची सोय सरकारने ठेवलेलीच नसणं हे प्रमुख कारण होतं हे खरंच आणि आर्थिक उदारीकरणानंतर असलं भुरटं ‘स्मगलिंग’ थांबलेलं आहे, हेही खरं.

जहांगीरमधली रंगचित्रं

दत्तात्रय पाडेकर हे मराठी वाचक-कलारसिकांच्या परिचयाचं नाव. त्यांच्या नव्या चित्रांचं प्रदर्शन ‘जहांगीर’च्या सभागृह दालनात ४ डिसेंबपर्यंत आहे. ही चित्रं लडाखच्या नुब्रा व्हॅलीमधली असली, तरी तिथला निसर्ग आणि लोकजीवन या तशा सार्वत्रिक चित्रविषयांऐवजी पाडेकरांनी तिथल्या उंटांवर लक्ष केंद्रित केलं आहे. हे उंट दोन मदारींचे आणि अधिक केसाळ असतात. उंटांचे चालणारे किंवा थबकलेले काफिले चित्रित करण्यासाठी पाडेकरांनी नव्यानं वापरलेलं तंत्र म्हणजे कापडावर अ‍ॅक्रिलिक रंगांनी, पण रंगाचा तरलपणा राखून आणि रंग मुद्दाम हवा तितका (आणि हवा तितकाच- नको तसा नव्हे!) पसरू देऊन ही चित्रं केली आहेत. याच प्रकारच्या चित्रांमध्ये काही ठिकाणी कोरडय़ा कापडावर, कोरडय़ा रंगांनी रंगकामही दिसतं; पण उंटांच्या पाठीवरली रंगबिरंगी खोगिरं वगैरे तपशील रंगवण्यापुरतंच ते वापरलं आहे. तैलरंगांमधली दोनतीन मोठी चित्रं आणि बॉलपेन तसंच ‘कॉन्टे’ (तैलखडू) या साधनांनिशी केलेली ड्रॉइंग्जसुद्धा प्रदर्शनात आहेत. या ड्रॉइंग्जमधून (विशेषत कॉन्टे वापरून केलंलं, बसून माना वळवलेल्या उंटांचं एक चित्र) दत्तात्रय पाडेकर हे अभिजाततेचा शोध पाश्चात्त्य पूर्वसुरींच्या मार्गानं घेताहेत असं दिसतं; ते स्वागतार्हदेखील आहेच.

‘जहांगीर’च्या पहिल्या वातानुकूल दालनात राजेंद्र दगडे यांनी त्यांच्या कर्जत परिसरात, तसंच केरळ आणि राजस्थानाच्या केलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. दुसऱ्या दालनात रणजित कुर्मी यांनी शैलीदार वैशिष्टय़ांची काळजीपूर्वक आणि आकर्षक मांडणी करीत रंगवलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. त्यात विषयनावीन्य कमी असलं तरी करडय़ा छटांच्या क्राँक्रीटजंगल शहरात उगवलेल्या रसरशीत हिरव्या वेलीचं एक चित्र लक्ष वेधून घेईल. तिसऱ्या दालनात रणदीप मुखर्जी यांनी ‘गंगा’ (गँजेस) या विषयावरली चित्रं मांडली आहेत. हा विषय रामकुमार यांची अमूर्तचित्रं आणि मनू पारेख यांची ‘अर्धअमूर्त’ चित्रं यांतून यापूर्वी जसा साकारत गेला, त्या संकेतांना रणदीप यांनी धक्का दिलेला नाही. मात्र तरीही स्वतची वाट शोधण्याची धडपड इथे दिसते. अगदी एका कोपऱ्यातलं, काळय़ा रात्रीत सर्वत्र पेटलेल्या दिवे-आरत्यांचं एक चित्र अनेकांना आवडेल असं आहे.

Story img Loader