शाळा म्हणजे चार भिंती, वर छप्पर, आजूबाजूला मैदान वगैरे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आदिवासींना तर शाळा म्हणजे काय, याची फारशी माहितीही नसते. मात्र, आता आदिवासींसाठी शाळेचे चित्र बदलले जाणार आहे. आदिवासी मुलांनी शाळेत यावे, त्यांनी शिकावे यासाठी आता चक्क एसटी महामंडळाने भंगारात काढलेल्या गाडय़ांचा वापर केला जाणार आहे! परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.मुदत संपलेल्या बसगाडय़ा एसटी महामंडळातर्फे भंगारात काढल्या जातात. त्यामुळे त्यांचा वापर तिथेच संपतो. परंतु आता सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून या बसगाडय़ा भंगारात विकण्याऐवजी आदिवासी भागात वर्गखोली म्हणून वापरण्यासाठी देणगी म्हणून किंवा अत्यल्प किमतीत देण्यात येणार आहेत. बसगाडय़ांचे टायर काढून टाकून वर्गखोली म्हणून वापरण्यासाठी त्यात सुयोग्य बदल केले जातील. आदिवासी भागात प्रत्येक शाळेसाठी किमान दोन बसगाडय़ा देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रावते यांनी दिली.ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी वरोरा (जि.चंद्रपूर) येथे केलेले काम अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पाहिले. त्यातून प्रेरणा घेऊन केसरकर यांनीही नाल्याचे बांधकाम केले आहे. त्यामुळे महामंडळाकडून खराब झालेले टायर उपलब्ध करून देऊन कोकणात बंधारे उभारले जातील आणि सिमेंटपेक्षा स्वस्तात ते काम होईल, असे रावते यांनी स्पष्ट केले.
भिंतीसाठी टायर..
बसगाडय़ांचे टायर हे नाल्यांची भिंत बांधण्यासाठी सिमेंटऐवजी वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील.
टायर, माती वापरून नाल्याची भिंत बांधून प्लास्टिकने ती आच्छादित केल्यास पाणी झिरपणार नाही