लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मुंबई : राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा प्राथमिक अंदाज ‘स्कायमेट’ या अमेरिकेतील खासगी संस्थेने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या सुमारे १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘स्कायमेट’तर्फे केलेल्या पहिल्या पूर्वानुमानामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होईल. पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या भागात अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, यंदा मोसमी पावसाचा दुसरा टप्पा (जुलै – ऑगस्ट) अधिक सक्रिय राहणार आहे. यामुळे जलसाठ्यांसाठी ही वेळ अनुकूल राहील, असे स्कायमेटने म्हटले आहे. जूनमध्ये सरासरी पावसाचा अंदाज ५० टक्के आहे. जुलैमध्ये ही शक्यता ६० टक्के इतकी आहे. ऑगस्टमध्ये सरासरी पावसाची शक्यता ४० टक्के आहे, तर सप्टेंबरमध्ये ६० टक्के इतकी आहे.
८९५ मिमी पावसाचा अंदाज

देशात यंदा जून – सप्टेंबरदरम्यान सरासरी ८९५ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत प्रामुख्याने देशात सरासरी ८६८ मिमी पाऊस पडतो.

सप्टेंबरमध्ये कोकण किनारपट्टीवर कमी पाऊस

भौगोलिक प्रदेशांबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार, केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोवा या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण किनारपट्टीवर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

ला निना आणि एल निनोचा प्रभाव कमी

ला निना कमकुवत आणि कमी कालावधीसाठी आहे. तसेच मोसमी पावसावर परिणाम करणाऱ्या अल निनोचीही फारसा प्रभाव जाणवणार नाही. ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) आणि ‘एन्सो न्यूट्रल’ स्थितीमुळे मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.

महिन्यानुसार पावसाचे विभाजन

जून – सरासरीच्या ९६ टक्के म्हणजे सुमारे १६५.३ मिमी पाऊस
जुलै – सरासरीच्या १०२ टक्के म्हणजे २८०.५ मिमी पाऊस
ऑगस्ट – सरासरीपेक्षा जास्त, अंश १०८ टक्के म्हणजे २५४.९ मिमी
सप्टेंबर – सरासरीच्या १०४ टक्के म्हणजे १६६.९ मिमी पावसाची शक्यता

पावसाची नोंद पाच मुख्य श्रेणींमध्ये

  • ९० टक्के पेक्षा कमी – अपुरा पाऊस
  • ९० ते ९५ टक्के – सरासरीपेक्षा कमी
  • ९६ ते १०४ टक्के – सरासरीइतका पाऊस
  • १०५ ते ११० टक्के – सरासरीपेक्षा जास्त
  • ११० टक्क्यांपेक्षा अधिक – भरपूर पाऊस
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satisfactory rainfall in maharashtra this year kerala and karnataka likely to receive maximum rainfall mumbai print news mrj