मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात पादचारी पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले असून मध्य रेल्वेने या कामासाठी शनिवारी मध्यरात्री १२.५० ते रविवारी पहाटे ५.५० पर्यंत पाच तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉककाळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर, काही मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावतील.
मध्य रेल्वेने प्रवासीभिमुख कामे वेगाने करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या गर्दीची कोंडी सोडविण्यासाठी ठाण्यात पादचारी पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि ५ वर (सीएसएमटी दिशेला) ५ मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात येत असून त्यासाठी ४ गर्डर १४० टन वजनी क्षमतेच्या क्रेनच्या मदतीने उभारण्यात येणार आहे. या कामासाठी शनिवारी रात्री १२.५० ते रविवारी पहाटे ५.५० वाजेपर्यंत मुलुंड – दिवादरम्यान अप धीमा (कळवा – मुलुंड) डाऊन जलद (मुलुंड – दिवा) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे गाडी क्रमांक ११००३ दादर – सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१७७ मुंबई – बनारस महानगरी आणि गाडी क्रमांक १२०५१ मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस विद्याविहार येथून पाचव्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे रेल्वेगाड्या १५ मिनिटे विलंबाने धावतील.
हेही वाचा – मुंबई : विमानतळावरील विमानत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी
हेही वाचा – मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे जानेवारीमध्ये सर्वेक्षण
अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ब्लॉकनंतर पहिली लोकल पहाटे ५.५६ वाजता ठाणे – सीएसएमटीदरम्यान धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.