मुंबई : रुपी बँक वाचविण्यासाठी बँकेच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. बँकेच्या अडचणी संबंधितांशी चर्चा करून दूर करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.

रुपी बँकेच्या शिष्टमंडळात रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित, बँक खातेधारक फोरमचे भालचंद्र कुळकर्णी आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांचा समावेश होता. रिझव्‍‌र्ह बँकेने रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. ही कारवाई करण्यापूर्वी रुपी बँकेला म्हणणे मांडण्याची संधीही दिली गेली नाही. बँकेने गेल्या सहा वर्षांत सातत्याने नफा कमावला असताना रिझव्‍‌र्ह बँकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. त्यामुळे ती मागे घेण्यात यावी, अशी बँकेची मागणी आहे. या संदर्भात संबंधितांशी चर्चा करून आणि बँकेचे हित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे, असे पंडित यांनी सांगितले.