स्कॅम २००३ – तेलगी स्टोरी’ ही वेबमालिका प्रदर्शनापूर्वीच वादात अडकण्याची चिन्हे आहेत. कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळा आणि या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्या जीवनावर आधारित वेबमालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध तेलगी याची मुलगी सना इरफान हिने मुंबईतील शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा >>>मुंबई: राहुल शेवाळे यांच्याविरोधात चेंबूरमध्ये निदर्शने
सना हिने तेलगी कुटुंबीयांच्या वतीने हा दावा दाखल केला आहे. या वेबमालिकेसाठी आमच्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली नाही, असा आरोप सना हिने केला आहे. तसेच या वेबमालिकेचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. तेलगीच्या कुटुंबीयांनी या वेबमालिकेचे निर्माते अॅपलॉज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हंसल मेहता, सरव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लाईव्ह यांच्याविरुद्ध दावा केला आहे. ही वेबमालिका एका पुस्तकावर आधारित आहे. मात्र या पुस्तकातील तथ्यांमध्ये विसंगती आहे. या पुस्तकातीलआपल्या वडिलांच्या व्यक्तिरेखेचे चित्रण खोटे, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय, अत्यंत बदनामीकारक आहे. आमची, आमच्या कुटुंबाची आणि आमच्या मृत वडिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने या वेबमालिकेची निर्मिती केली गेली आहे. त्याचप्रमाणे या वेब मालिकेमुळे आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे.ही वेब मालिका प्रदर्शित झाल्यास आमचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा दावा सना हिने केला आहे.
हेही वाचा >>>मुंबई: गिरणी कामगार घर सोडत-२०२०; पात्र गिरणी कामगार, वारसांना तात्पुरते ऑनलाईन देकार पत्र
आपल्या वडिलांनी अनेक सामाजिक कारणांसाठी बराच वेळ, पैसा खर्च केला होता. पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, मंदिरे आणि मशिदी बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यांनी अनेक गरीब मुलांचे शैक्षणिक कर्ज देखील फेडले होते, असा दावाही सना यांनी केला आहे. मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी सुनावण्यात आलेली शिक्षा भोगत असताना तेलगी याचा ऑक्टोबर २०१७ मध्ये बंगळुरूच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता.