लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना देत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात जातीने लक्ष घातले असले तरी केंद्र सरकारबद्दलची नाराजी तसेच राज्यात पक्षाच्या विरोधात निर्माण झालेले वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी तापदायक ठरणार आहे.
शरद पवार यांनी दोन दिवस राज्यातील नेत्यांशी चर्चा करून गेल्या वेळी लढलेल्या २२ मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेत राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला. गेल्या वेळा जिंकलेल्या आठही जागा कायम राखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान आहे. संजीव नाईक (ठाणे), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई) आणि समीर भुजबळ (नाशिक) या जागा कायम राखण्याकरिता सारी शक्ती पणाला लावावी लागेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या जागा गेल्या वेळी शिवसेना-भाजप आणि मनसेच्या मतविभाजनामुळे राष्ट्रवादीच्या पदरात पडल्या होत्या.  
गेल्या वेळी पराभूत झालेल्यापैकी मावळ, कोल्हापूर, नगर, हातकणंगले, हिंगोली या पाच जागा हाती लागणे शक्य आहे, असे राष्ट्रवादीचे गणित आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर जिंकण्यावर अजित पवार यांचा भर आहे. परभणी, कल्याण आणि दिंडोरी या जागाजिंकण्यासाठीच ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्याचे पवार यांच्या मनात आहे. नवा चेहरा फारसा फायद्याचा ठरत नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गेल्या वेळी निदर्शनास आले. साताऱ्याची जागा हक्काची असली तरी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यापासून पक्षाला किंमतच दिलेली नाही. अगदी शनिवारी सातारा मतदारसंघाच्या आढाव्याच्या वेळीही ते उपस्थित राहिले नाहीत. यूपीए सरकारवरील घोटाळ्यांचे आरोप, महागाई, सर्वच आघाडय़ांवर आलेले अपयश हे घटक राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल आहेत. सरकारच्या विरोधातील नाराजीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.
संख्याबळ किती वाढणार ?
केंद्रात सत्तास्थापनेत शरद पवार यांचे राजकीय महत्त्व किंवा ताकद वाढावी या उद्देशाने राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक आतापासूनच गांभीर्याने घेतली आहे. सध्याच्या आठही जागा कायम राखण्याचे आव्हान असताना संख्याबळ वाढविण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे १५ ते १६ जागांचे लक्ष्य असले तरी हा पल्ला सध्या तरी मोठाच आहे.