मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर खडबडून जागा झालेल्या सुरक्षा विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) अनेक प्रमुख रेल्वेच्या स्थानकांवर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सज्ज केली. मात्र, दहशतवादी हल्ल्याला काही वर्षे सरताच सुरक्षा यंत्रणा कमकुवत होऊ लागली आहे. दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असलेल्या सीएसएमटी स्थानकातील बॅग, पार्सल तपासण्याची अद्ययावत स्कॅनर व अन्य उपकरणे बंद असल्याचे निदर्शनास आले असून बॅग स्कॅनर धूळखात पडल्याने प्रवाशांच्या सामानाची तपासणी बंद झाली आहे.
हेही वाचा >>> मुंबई: अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहानिमित्त विक्रोळी, गोरेगाव, लोअर परळ येथे प्रदर्शन
सीएसएमटी स्थानकात दररोज लाखो प्रवासी येत-जात असतात. लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यासाठी सीएसएमटी स्थानकाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४, ५ आणि ६ येथील आरक्षण केंद्र, चौकशी केंद्र आणि तिकीट केंद्राजवळ बॅग स्कॅनर यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रे बंदच आहेत. तसेच, येथे पर्यायी सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली नाही.
‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीएसएमटी स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. सीएसएमटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्कॅनर यंत्र आणि ‘डोअर मेटल डिटेक्टर’ बसविण्यात आले. डिटेक्टर आणि स्कॅनर यंत्रामधून प्रवासी आणि सामानाची योग्य तपासणी करणे शक्य झाले. मात्र, स्थानकातील प्रवेशद्वारावरील चारही यंत्रे बंद आहेत. तसेच, बहुतांश ‘डोअर मेटल डिटेक्टर’ही बिघडले आहेत. सीएसएमटी स्थानकात सुमारे १६ ‘डोअर मेटल डिटेक्टर’ बसवण्यात आले आहेत. यापैकी सातहून अधिक डिटेक्टर नादुरुस्त आहेत. तसेच, प्रवासी डिटेक्टरचा वापर न करता स्थानकात ये-जा करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
हेही वाचा >>> मुंबई: मध्य रेल्वेवर १०० उन्हाळी विशेष एक्स्प्रेस धावणार
याप्रकरणी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येईल.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
बॅग स्कॅनर यंत्र, डोअर मेटल डिटेक्टर बंद असल्याबाबत रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. साधारण जानेवारीपासून पत्रव्यवहार सुरू आहे.
– विजय तायडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी