ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध जलसाठे अपुरे आणि भविष्यकालीन गरजेसाठी प्रस्तावित धरणे पर्यावरणीय प्रश्न तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेली दहा वर्षे कागदावरच असताना तलासरी तालुक्यातील कुर्जे धरणातले पाणी मात्र गेली ३५ वर्षे वापराविना पडून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
तलासरी तालुक्यातील दापचरी येथील दुग्ध प्रकल्पासाठी सत्तरच्या दशकात सार्वजनिक बांधकाम खात्याने हे धरण बांधले. मात्र मुंबईतील तबेले स्थलांतरित न झाल्याने हा प्रकल्प बारगळला. तेव्हापासून दरवर्षी पावसाळ्यात हे धरण भरते आणि कालव्यावाटे वाहून जाते. मात्र वर्षभर पाण्याचे दुर्भिक्ष सहन कराव्या लागणाऱ्या तलासरीवासीयांना या धरणातून पाणीपुरवठा केला जात नाही. या धरणातून एक कालवा दापचरी गावात जातो. पंचक्रोशीतील काही गावांतील रहिवाशी त्या पाण्याचा वापर करतात. वास्तविक संपूर्ण तलासरी तालुक्यास या धरणातून पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र एकीकडे थेंब थेंब पाणी वाचवा, असा संदेश देणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे कोटय़वधी लिटर्स पाणी वाया जात आहे.
पाणीटंचाईमुळे येथे शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. कुर्जे धरण तालुक्यासाठी उपलब्ध झाले तर ठाणे जिल्ह्य़ाच्या गुजरात सीमेवरील हा तालुका पाणीपुरवठय़ाबाबत स्वयंपूर्ण होईलच,  शिवाय नव्याने होऊ घातलेल्या आदिवासी जिल्ह्य़ासाठीही हे धरण लाभदायी ठरू शकणार आहे. या धरणालगत ३५ एकर जागेत इस्कॉनचा शेती प्रकल्प आहे. येथे शेकडो फूट खोदूनही पाणी लागले नाही. त्यामुळे सध्या मोठय़ा तळ्यात पर्जन्यजलसाठा करून येथे भाजीपाला पिकवला जातो. शेजारी धरण असल्याने तिथून रितसर पाणी मिळावे, अशी मागणी एका पत्राद्वारे या प्रकल्पाचे अध्यक्ष दामोदर दास यांनी धरणाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक कार्यालयात केली. तेव्हा त्यांना ‘कालव्यातून पाणी घ्या’ असे अजब उत्तर देण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील सर्व धरणांचे व्यवस्थापन असणाऱ्या पाटबंधारे विभागाकडून या धरणाबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. दापचरी प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने हे धरण बांधले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. स्थानिकांनी मागणी केल्यास हे धरण तलासरीवासीयांना शासन उपलब्ध करून देऊ शकेल. मात्र सध्या तरी ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच अवस्था आहे, अशी प्रतिक्रिया कोकण विभाग पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी यासंदर्भात व्यक्त केली आहे.
जलनीतीचे अनुसरण व्हावे- माधवराव चितळे
सध्या राज्यात सर्वाधिक वेगाने नागरीकरण होत असल्याने येथील वाढत्या लोकसंख्येसाठी पाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी प्रस्तावित केलेली काळू, शाई तसेच पोशीर ही धरणे अद्याप कागदावरच आहेत. दहा वर्षांच्या अडथळ्यानंतर आता कुठे बारवी विस्तारीकरण प्रकल्प मार्गी लागला आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता लक्षात घेता या धरणातील पाणी तलासरी तसेच परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ आणि मुंबई महानगरीय प्रदेशासाठी भविष्यकालीन जलस्रोतांविषयी अहवाल तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष माधवराव चितळे यांनी यासंदर्भात व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा