ताई, ट्रेनचा अपघात झालाय.. मला लागलेय.. अचानक वाजलेला फोन उचलला तर भावाचा आवाज होता. काही तासांआधीच ही ताई आपल्या भावावा ट्रेनमध्ये बसवून आली होती. आता हे काय ऐकू येत होते? निव्वळ एक वाक्य बोलून फोन कट झाला. आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. नक्की काय झाले, अपघात कुठे आणि कसा झाला? काहीच कळायला मार्ग नव्हता. भावाचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे आपला भाऊ नक्की कुठे आणि कसा आहे हे कळत नव्हते. थोडय़ाच वेळात टीव्हीवर कोकण रेल्वेच्या अपघाताच्या बातम्या झळकू लागल्या आणि मग हळूहळू सगळे चित्र स्पष्ट झाले.
दिवा-सावंतवाडी गाडीने सकाळी आनंदात गावाकडे निघालेल्या आपल्या भावाला काही तासांनी शीव रुग्णालयात जखमी अवस्थेत पाहावे लागेल याची कल्पनाही अभय वेंगुर्लेकर या जखमीच्या बहिणीने केली नव्हती. ‘त्याच्या छातीला आणि पायाला मुका मार लागला आहे आणि डोक्याला दगड लागला आहे. तो दरवाज्यात उभा होता. त्यामुळे कित्येक जण त्याच्या अंगावर पडले. पण त्याही अवस्थेत त्याने आम्हाला कळवले म्हणून आम्हाला कळाले. नाही तर ठाऊक नाही कधी कळाले असते..’ वेंगुर्लेकर यांच्या बहिणीने आपले अश्रू आवरत सांगितले. रविवारी दुपारी मुंबईच्या शीव रुग्णालयात आणलेल्या प्रत्येक अपघातग्रस्ताच्या नातेवाईकाची कहाणी थोडय़ा फार फरकाने अशीच होती. एका कोपऱ्यात दोन चिमुकल्या आपल्या मामीच्या कुशीत घाबरून निजल्या होत्या. आपल्याबरोबर काही वेळापूर्वी काय झाले याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना फक्त एवढच कळत होते की काही तासांपूर्वी आपल्याबरोबर असलेले बाबा आता निपचित पडून होते. लग्नासाठी कोकणातून मुंबईत आलेल्या केतन कुंभार यांच्या कुटुंबाच्या आनंदावर या अपघाताने विरजण टाकले होते. आज केतन कुंभारवर ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया चालू होती आणि त्यांची ११ वर्षांची चिमुरडी जखमी अवस्थेत कॉटवर पडली होती. ‘आम्ही फक्त डॉक्टर काय सांगताहेत याची वाट पाहतोय,’ त्याचे नातेवाईक खिन्नतेने सांगत होते. एकाच वेळी नवऱ्याकडे पाहायचे, लेकीकडे लक्ष द्यायचे की बाहेर भांबावलेल्या मुलींना कुशीत घेऊन निजवायचे, हा पेच त्यांच्या पत्नीला पडला होता.
४५ वर्षांचे रवींद्र सावंत त्यांच्या आईवडिलांना आणण्यासाठी कोकणात निघाले होते, पण या अपघातात जखमी होऊन ते रुग्णालयात दाखल झाले. लग्नासाठी कौतुकाने मुंबईत आलेल्या अनिता रणपिसे यांचे मामा अनंत सावंत यांची कहाणी पण अशीच काहीशी होती. ‘परवा लग्नानंतर आम्हाला भेटायला म्हणून ते काल एक दिवस मुंबईला थांबले आणि आज हे असे झाले.’ कोणाचे आई-वडील सापडत नव्हते, तर कोणाला आपल्या चिमुरडय़ांचा थांगपत्ता लागत नव्हता. बाहेर वाट पाहणारे त्यांचे नातेवाईकसुद्धा भांबावलेल्या अवस्थेत पुढे काय होते आहे हे पाहत बसले होते. क्षणाक्षणाला रुग्णालयात येणाऱ्या अपघातातील जखमींची संख्या वाढत होती. कोणाच्या हाताला मार लागला होता, तर कोणाच्या पायाला. कुणाची उजवी बाजू फ्रॅक्चर झाली होती. परिस्थिती गंभीर होती. प्रत्येक जण आशा-निराशेच्या हिंदोळ्यात झोके घेत होता..
सायंकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे १६ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी एक रुग्ण दगावला असून बाकी १५ पैकी एकाची स्थिती चिंताजनक आहे. इतर १४ जणांच्या प्रकृती आता स्थिर असून धोका टळला आहे. दाखल झालेल्या रुग्णांपैकी अनेकांना मुका मार लागला आहे तर काहींना फ्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाली आहे. ज्यादा बेड, डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची सज्जता ठेवण्यात आली आहे.
डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, शीव रुग्णालय.