मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता निकष ५० वरून १५ पर्सेंटाईल केल्यानंतर प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीचे तिसऱ्या फेरीसाठीचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत नोंदणी, प्रवेश शुल्क व आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळामार्फत भरता येणार आहे.
हेही वाचा >>> बेकायदा घराची कागदपत्रेही अनधिकृतच; भिवंडीतील पाच बेकायदा इमारतींना संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
एमडी, एमएस, डीएनबी या पदव्युत्तर अभ्याक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेमध्ये ५० पर्सेंटाईल अशी पात्रता निश्चित कऱण्यात आली आहे. मात्र अनेक विषयांच्या जागा रिक्त राहिल्याने पात्रता निकष शिथील करण्याची वेळ यंदाही ओढवली आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने मागील आठवड्यामध्ये पदव्युत्तर प्रवेशाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक असलेले पात्रता निकष १५ पर्सेंटाईलपर्यंत कमी केले. त्यामुळे नव्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये सामावून घेण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळपत्रकानुसार नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी, प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे २३ जानेवारी रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत संकेतस्थळावर भरता येणार आहे. तसेच २३ जानेवारी रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
दरम्यान, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन सत्रांमध्ये राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-पीजी) घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २३ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्यातील २ हजार ५१० जागांसाठी २९ नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला पासून सुरुवात झाली. २९ नोव्हेंबरला राज्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी झाली. तर २४ डिसेंबरपासून दुसरी फेरी राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये या अभ्यासक्रमासाठी १ हजार ६९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ८१६ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागांवर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश होणार आहेत.
तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक
नव्याने सहभागी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी – २४ जानेवारी
सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित राज्य गुणवत्ता यादी – २७ जानेवारी
पसंतीक्रम भरणे – २७ ते २९ जानेवारी
तिसरी गुणवत्ता यादी जाहीर – ३१ जानेवारी
प्रत्यक्ष महाविद्यलयात जाऊन प्रवेश घेणे – १ ते ५ फेब्रुवारी
पहिली अतिरिक्त फेरी – ८ फेब्रुवारी
पसंतीक्रम भरणे – ९ ते १० फेब्रुवारी
गुणवत्ता यादी जाहीर – ११ फेब्रुवारी
प्रत्यक्ष महाविद्यलयात जाऊन प्रवेश घेणे – १२ ते १४ फेब्रुवारी