मुंबई : चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५पर्यंत मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांच्या ३५ हजार फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विलंबाने धावलेल्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये सहा हजारांनी वाढ झाली आहे. याचा फटका नोकरदार, रुग्ण, विद्यार्थी, छोट्या व्यापाऱ्यांना बसला.

गाड्यांची अपुरी संख्या आणि अवेळी धावणाऱ्या उपनगरी रेल्वेगाड्यांमुळे ‘एमएमआर’ प्रदेशातील गर्दीचा भार पेलणे अशक्य झाले आहे. प्रचंड गर्दीच्या वेळी धावत्या गाड्यांमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

उपनगरी रेल्वेगाड्यांच्या ऐवजी लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य, तांत्रिक बिघाड, पायाभूत कामे, आपत्कालीन ब्लॉकमुळे रेल्वेसेवा कोलमडल्याने तुडुंब गर्दीने भरलेल्या उपनगरी गाड्यांमध्ये प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी, आजारी प्रवाशांना उपनगरी गाड्यांचा खोळंबा असह्य होऊ लागला आहे.

मध्य रेल्वेवर उपनगरी गाड्यांच्या दररोज १,८१० होतात, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, यापैकी बहुसंख्य फेऱ्या रद्द करण्यात येतात. अनेक उपनगरी गाड्या वेळेवर धावत नाहीत. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत सुमारे ३५ हजार फेऱ्या उशिराने होत्या.

कल्याणकरांचेही हाल

कल्याण रेल्वे स्थानकात कसारा आणि कर्जत दिशेकडे जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या थांबतात. त्यामुळे उपनगरी गाड्यांसाठी मार्ग उपलब्ध होत नाही. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान बराच वेळ उपनगरी गाड्या उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांना वेळेत कल्याण स्थानक वेळेत गाठता येत नाही.

● आपत्कालीन साखळी खेचणे, रेल्वे रुळ ओलांडताना प्रवाशांचा होणाऱ्या अपघातांमुळे उपनगरी गाड्यांचा वक्तशीरपणा कमी होत आहे. तसेच समांतर रस्ता फाटकावरील (लेव्हल क्रॉसिंग गेट) वाहनांची वाहतूक अतिरिक्त काळ सुरू आहेत.

लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य

लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने उपनगरी रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ४ हजार फेऱ्या लांबपल्याच्या गाड्यांमुळे विलंबाने धावल्या. तर, २०२३-२४ या आर्थिक वर्षात उपनगरी गाड्यांच्या ३ हजार फेऱ्या निश्चित वेळापत्रकानुसार नव्हत्या.

लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने उपनगरी रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ४ हजार फेऱ्या लांबपल्याच्या गाड्यांमुळे विलंबाने धावल्या. तर, २०२३-२४ या आर्थिक वर्षात उपनगरी गाड्यांच्या ३ हजार फेऱ्या निश्चित वेळापत्रकानुसार नव्हत्या.

Story img Loader