बारावीच्या सुधारित वेळापत्रकानुसार ज्या दिवशी (१२ मार्च) जीवशास्त्राची परीक्षा ठेवण्यात आली आहे, त्याच दिवशी चौथी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षाही होणार आहे.
बारावीचा जीवशास्त्राचा पेपर १२ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या दोन्ही परीक्षांसाठी शाळांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहे. त्यामुळे, काही परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी शिष्यवृत्ती आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा होणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर वर्गाची कमतरता असेल त्या ठिकाणी गोंधळ उद्भवू शकतो.
जीवशास्त्राचा पेपर देणारे राज्यात अवघे अडीच ते तीन लाख विद्यार्थी आहेत. पण, चौथी-सातवीच्या शिष्यवृत्तीला बसणाऱ्या लाखों विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता काही परीक्षा केंद्रांवर वर्ग कमी पडू शकतात. सुदैवाने जीवशास्त्राचे विद्यार्थी कमी असल्याने अशी परीक्षा केंद्रे फारच थोडी असतील. पण, गोंधळ टाळण्यासाठी आम्ही परीक्षा केंद्रांचा आढावा घेत आहोत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.

Story img Loader