शाळांमध्ये संभ्रम
दरवर्षी साधारणपणे १४ जानेवारीला येणारी मकरसंक्रांत यंदा १५ जानेवारीला आल्याने शाळांमध्ये सुट्टीवरून गोंधळाचे वातावरण आहे. आधी जाहीर केलेल्या शाळांच्या वेळापत्रकानुसार मकरसंक्रांतीची सुट्टी १४ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात मकरसंक्रांत यंदा १५ जानेवारीला आली आहे. त्यामुळे साताऱ्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी १४ ऐवजी १५ जानेवारीला मकरसंक्रांतीची सुट्टी घेण्यात यावी, असे एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र इतर विभागांनी असा खुलासा अद्याप केलेला नाही. त्यामुळे शाळांनी नेमकी सुट्टी कधी घ्यावी, याबाबत संभ्रम आहे, असे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे उदय नरे यांनी सांगितले.
भविष्यातही १५ जानेवारीला मकरसंक्रांत
आगामी नऊ वर्षांतील मकरसंक्रांतीच्या दिवसांची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. २०१७, २०१८, २०२१, २०२२ आणि २०२२ या वर्षी मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी येणार आहे, तर २०१९, २०२०, २०२३, २०२४ या दिवशी १५ जानेवारी रोजी येणार आहे. मकरसंक्रांत अमुक रंगावर आहे, ती लहान मुले, वृद्ध माणसांवर, तरुणांवर असल्याने त्यांना वाईट आहे, त्यासाठी अमुक करा असे सांगितले जाते. मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही सोमण यांनी केले.