स्कूल बसच्या निर्णयाबाबत दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डाही अस्वस्थ असून याबाबत ते लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. स्कूल बसची नियमावली शिक्षणमंत्र्यांनाच मान्य नसल्याने ही नियमावली मागे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
मागील आठवडय़ात शिक्षण विभागाने जारी केलेल्या स्कूलबस नियमावलीला मुख्याध्यापकांनी कडाडून विरोध केला होता. या संदर्भात विविध संघटना शिक्षणमंत्र्यांची भेट घेत असून शनिवारी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही त्यांची भेट घेतली. त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांनी त्यांना निर्णयाबाबतची नाराजी बोलून दाखवली व याबाबत ते मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही स्पष्ट केल्याचे पाटील यांनी सांगितले. या निर्णयाबाबत आपल्याला सविस्तर माहिती नसल्याचे शिक्षणमंत्री दर्डा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र या निर्णयाबाबत ते गांभीर्याने विचार करत असून त्यांना यातील काही नियम जाचक वाटत आहेत. परिवहन विभागाकडून आलेल्या या निर्णयाला शिक्षण खात्याने कोणताही विचार न करता मंजुरी दिली आणि त्याबाबतचा सरकारी आदेश (जीआर) प्रसिद्ध केला. यातील अनेक अटी ग्रामीण भागासाठी जाचक असून तेथे त्या प्रत्यक्षात येणे कठीण असल्याने हा निर्णय कोणत्याही निकषांवर लागू होणे कठीण असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.

Story img Loader