मुंबईतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनांना दिले आहेत. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्यतो विद्यार्थी मोठय़ा संख्येने एखाद्या ठिकाणी जमणार नाहीत याची काळजी घ्यावी, त्याचबरोबर स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवावी आणि स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी योग्य ती पावले उचलून पालकांना मार्गदर्शन करावे, असे आदेश शाळा व्यवस्थापनांना देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या या रुग्णांची संख्या कमी असली तरी स्वाइन फ्लूची साथ झपाटय़ाने पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची बाधा होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाने शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनांना दिले आहेत.

Story img Loader