विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसेसमधील गैरप्रकार रोखण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने जबाबदारी स्वीकारावी, ही परिवहन विभागाची विनंती शाळा व्यवस्थापनांनी झिडकारली आहे. प्राचार्यापासून सर्वच शिक्षकांवर सध्या कामाचा ताण असून अतिरिक्त जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे स्पष्टपणे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
जुहू येथील नरसी मोनजी शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यानंतर परिवहन विभागाने शाळांचे प्राचार्य, शिक्षक, परिवहन विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी यांची एक कार्यशाळा गुरुवारी अंधेरी येथील विभागीय परिवहन विभागाच्या कार्यालयात घेतली होती. शाळांच्या बसेसबाबत आखण्यात आलेल्या सुरक्षा नियमावलीची लेखी प्रत यावेळी सर्व उपस्थितांना देण्यात आली. सध्या शिक्षकांवर विविध कामे टाकण्यात येत असून शिक्षकांना जराही वेळ मिळत नसल्याचे काही प्राचार्यानी यावेळी सांगितले. शाळांच्या बसेसमध्ये काही गैरप्रकार होत असतील तर त्याची जबाबदारी आम्ही कशी घेणार, असा प्रश्न उपस्थित करत संस्थाचालक व शिक्षकांनी ही जबाबदारी कंत्राटदार, परिवहन विभागाची तसेच वाहतूक पोलिसांची असल्याचे सांगितले. मात्र शाळांच्या बसेसच्या सुरक्षा नियमावलींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.