विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानाच्या हक्काबाबत ‘सुजाण’ मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता शाळेतल्या ‘अजाण’ विद्यार्थ्यांना कामाला लावले जाणार आहे. काही गावांमध्ये तर विद्यार्थ्यांना दुपारी १२च्या टळटळीत उन्हात ‘प्रभात’फेरी काढून या जाणीवजागृतीच्या कामाला जुंपण्यात आल्याने शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये कमालीचा संताप आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हा आधीच ‘प्रशासकीय’ कामाच्या ओझ्याने पुरता वाकून गेला आहे. त्यात ज्या ठिकाणी ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन मतदानाच्या जागरूकतेचे काम करण्याचे आदेश काही ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिले आहेत. एका गावातील शाळेत तर एक निवडणूक अधिकारी दुपारी साडेअकराच्या सुमारासच दत्त म्हणून येऊन उभे राहिले. ‘चला आता मुलांना प्रभातफेरीकरिता बाहेर काढा,’ असे फर्मान सोडत त्यांनी शिक्षकांचा विरोध असताना मुलांना गावभर ‘मतदान हक्कबजावा’सारख्या घोषणा देत फिरविले. दुपारच्या उन्हात विद्यार्थ्यांना गावभर फिरवू नका, अशी विनंती करूनही अधिकारी ऐकण्यास तयार नव्हते. गावातील या ‘प्रभातफेरी’चे व्हिडीओ चित्रीकरण आणि छायाचित्रण करून अधिकारी तेथून निघाले आणि विद्यार्थ्यांची पुढची गावभर होणारी तंगडतोड थांबली.

मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा स्तरावर विविध उपक्रम घेतले जात आहेत. अर्थात हे सर्व उपक्रम हे स्वेच्छेने करावयाचे आहेत. त्यासाठी कुठलीही सक्ती केलेली नाही. प्रत्येक जिल्हा आपला कार्यक्रम ठरवतो आणि आम्ही सर्व घटकांच्या सहभागाचे स्वागतच करतो.
– नितीन गद्रे, राज्याचे
मुख्य निवडणूक अधिकारी

Story img Loader