येत्या २१ जूनला रविवार येत असला, तरी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात यावे, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले. रविवारी शाळेत आल्याची शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नंतर बदली सुटी देण्यात येईल आणि याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रकही काढले जाईल, असे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातही योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, हा योग दिन एका दिवसापुरता योग सिमीत न राहता महाराष्ट्रात आता योगपर्व सुरू करुया आणि हा दिवस यशस्वी करुया तसेच योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत आणि स्वस्थ विद्यार्थी निर्माण करुया, असे आवाहन तावडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन पूर्व तयारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, योग समितीचे निमंत्रक उदय देशपांडे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत तावडे म्हणाले, शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात योगाला अंतर्भूत करणे आवश्यक आहे. आपण यासाठी शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. आज महाराष्ट्रात १,०६,००० शाळांमध्ये दोन कोटींहून अधिक प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला परिणाम होण्यासाठी व उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना योग येणे आवश्यक आहे.
रविवार, आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
येत्या २१ जूनला रविवार येत असला, तरी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात यावे, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले.
First published on: 01-06-2015 at 04:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools in maharashtra should participate in international yoga day