मराठी विज्ञान परिषदेचे ४७ वे वार्षिक अधिवेशन यंदा बारामतीला होणार असून भूशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर हे या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच या अधिवेशनातही विज्ञान शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा अनेकविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी विज्ञान परिषदेचे वार्षिक अधिवेशन शुक्रवार दिनांक ७ डिसेंबर ते रविवार दिनांक ९ डिसेंबर २०१२ दरम्यान बारामती येथील गदिमा सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवणारे भूशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी दुष्काळी प्रदेशातही पाण्याचा सुकाळ कसा आणता येईल, याचे प्रत्यंतर आणून दिले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा बारमाही दुष्काळी प्रदेश आहे. मात्र, अशा प्रदेशातही ८० चौरस मीटरच्या पट्टय़ात खानापूरकरांनी पावसाचे पाणी साठवून शिरपूरला पाच वर्ष बारमाही पाणी उपलब्ध करून दिले. खानापूरकरांचा हा प्रयोग महाराष्ट्रभर करून सगळीकडे सुजलाम सुफलाम परिस्थिती निर्माण करणे शक्य आहे. खानापूरकरांसारख्या प्रयोगशील भूशास्त्रज्ञाचे विचार आणि मार्गदर्शन या अधिवेशाच्या निमित्ताने लाभणार आहे. या अधिवेशनात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रा. बाळ पेंढारकर, स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी, विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती यांच्याशी ९७६३७७५१९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.     

Story img Loader