व्यासंगी अभ्यासक, सिद्धहस्त विज्ञान लेखक, प्रा. मोहन आपटे यांचे मंगळवारी पहाटे २ वाजता विलेपार्ले येथे नानावटी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, अवकाश, शरीरशास्त्र, इतिहास, संगणक, निसर्ग असे विविधस्पर्शी विपुल लिखाण प्रा. आपटे यांनी केले. विविध विषयांवरील त्यांची ७५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठीतून सोप्या भाषेत वैज्ञानिक जागृती करणारे, वैज्ञानिक वास्तव मांडणारे लिखाण त्यांनी केले. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ या साप्ताहिक पुरवणीतील खगोलशास्त्रावरील त्यांचे सदर लोकप्रिय होते. मराठीबरोबरच त्यांनी इंग्रजीतून नऊ पुस्तकांचे लिखाण केले आहे. वैज्ञानिक विषय सोप्या भाषेत समाजावून सांगणारी व्याख्याने आणि प्रदर्शनासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला. अखेरच्या काळात आजारपणामुळे अंथरुणास खिळेपर्यंत ते कार्यरत होते. ते अविवाहित होते.

Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Devarpade School, Dada Bhuse Visit Malegaon Taluka ,
मालेगावात शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थी अन् शिक्षकांची ‘शाळा’

कोकणात राजापूरजवळचे कुवेशी हे मोहन आपटे यांचे जन्मगाव. त्यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी पूर्ण झाले. भौतिकशास्त्रातील पदवी त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात आणि पदव्युत्तर शिक्षण अहमदाबाद विद्यापीठातून पूर्ण केले. भारतीय विद्याभवन सोमाणी महाविद्यालयात त्यांनी १९६६ ते १९९८ या काळात भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. निवृत्त होताना महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे ते प्रमुख होते. तसेच काही काळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबई विभागाचे मोहन आपटे अध्यक्ष होते.

सोप्या भाषेत विज्ञानविषयक लेखन हा आपटे यांचा हातखंडा होता. आधुनिक विज्ञानात सिद्ध होऊ शकणाऱ्या विषयांवर त्यांनी लेखन केले. आपटे यांच्या ‘अण्वस्त्रांचा मृत्युघोष’, ‘अग्निनृत्य’ आणि ‘अवकाशातील भ्रमंती भाग १, २ आणि ३’ या पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मय राज्यपुरस्कार मिळाला आहे. ‘मला उत्तर हवंय’ ही अकरा पुस्तकांची मालिका खूप गाजली. त्यामध्ये अगदी साध्या विज्ञानविषयक शंकांना सोप्या भाषेत उत्तरे दिली आहेत. त्या त्या विषयावरील शंभर प्रश्नांची उत्तरे एका पुस्तिकेत मांडली आहेत. भास्कराचार्याचे श्लोक, त्यांची गणिती सूत्रे त्यांनी सोप्या मराठीत मांडली. खगोलशास्त्रातील त्यांच्या योगदानासाठी खगोल मंडळाने त्यांना २००५ साली भास्कराचार्य यांच्या नावाने दिला जाणारा ‘भास्कर’ पुरस्कार दिला होता.

आपटे हे अनेक वैज्ञानिक आणि सामाजिक संस्थांशी निगडित होते. जनसेवा समिती, विले पार्ले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याचबरोबर खगोल मंडळ, मराठी विज्ञान परिषद, विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघ आणि उत्कर्ष मंडळ या संस्थांच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी स्थापलेल्या जनसेवा समिती या संस्थेमध्ये सामाजिक कार्यापासून, विज्ञान, खगोलशास्त्र, इतिहास ते दुर्गभ्रमंती अशा अनेक विषयांना चालना देणारे उपक्रम हाती घेण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला विभागामध्येदेखील सुरुवातीच्या काळात सक्रिय होते. विद्यार्थीदशेत त्यांनी मल्लविद्यादेखील शिकली होती. विज्ञानाबरोबरच त्यांना चित्रकलेतही गती होती. तसेच ते कविताही करायचे.

प्रा. आपटे म्हणजे चालताबोलता ज्ञानकोशच होता. समाजाच्या सेवेसाठी झटणे हा त्यांचा बाणा होता. सर्वाना बरोबर घेऊन जाणारे असे व्यक्तिमत्त्व होते. कडक शिस्तप्रिय असले तरी तरुणांना आकर्षित करणारा त्यांचा स्वभाव होता. अनेक पिढय़ांवर विज्ञानसंस्काराचे काम त्यांनी केले.

– पराग लिमये, कार्यवाह, जनसेवा समिती, विलेपार्ले

प्रा. मोहन आपटे यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होताच, पण अभ्यासोनी प्रकटावे अशी त्यांची वृत्ती होती. ठणठणीत प्रकृती आणि खणखणीत वाणी असलेल्या प्रा. आपटे यांच्यात एक कार्यकर्ता दडला होता. त्यांनी अनेकांना ऊर्जा दिलीच, पण वैज्ञानिक चिकित्सक वृत्तीने पाहायला शिकवले. खगोल मंडळाचे ते आधारस्तंभ होते.

– दिलीप जोशी, खगोल मंडळ संस्थापक सदस्य.

Story img Loader