बंगळुरू येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून बीएआरसीमधील वैज्ञानिकाला परिचित व्यक्तीने १३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा >>> मुंबई:घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा तोतया सैनिक अटकेत
चेंबूरमधील भाभा अणुसंशोधन केंद्रातील एका वैज्ञानिकाच्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या महाविद्यालयात प्रवेश हवा होता. ही बाब त्यांनी एका परिचित व्यक्तीला सांगितली. त्याने बंगळुरू येथे कमी पैशात वैद्यकीय प्रवेश मिळून देण्याचे आमिष वैज्ञानिकांना दाखविले. गेल्या तीन वर्षात त्याने वैज्ञानिकाकडून १२ लाख ६० हजार रुपये उकळले. मात्र अनेक दिवस उलटल्यानंतर मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे वैज्ञानिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.