शीळफाटा येथील लकी कंपाऊंडमधील इमारत दुर्घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या दृष्टिकोनातून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी उत्तरांचल येथून सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटचे शास्त्रज्ञ बी. के. राव यांना पाचारण केले होते. त्यांनी गेले दोन दिवस दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसराची पाहणी करून हे बांधकाम ढिसाळ असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. तसेच येत्या आठ दिवसांत दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बांधकामासंबंधीचा सविस्तर अहवाल ते पोलिसांना सादर करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लकी कंपाऊंडमधील सात मजली अनधिकृत इमारत कोसळून ७४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने महापालिकेच्या दोन उपायुक्तांसह अधिकारी, पोलीस कर्मचारी, स्थानिक नगरसेवक आणि पत्रकार आदींना अटक केली आहे. या सर्व आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे बांधकाम मजबूत होते का, ते कशा प्रकारे करण्यात आले होते, याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी पोलिसांनी उत्तरांचल येथून सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटचे शास्त्रज्ञ बी. के. राव यांना ठाण्यात बोलविले होते. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी राव हे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा अभ्यास करण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यांनी या इमारतीच्या संपूर्ण परिसराची पाहणी करून त्याचा सविस्तर आढावा घेतला. या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. तसेच वास्तुविशारदही नव्हता. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम किती ढिसाळ झाले असावे, याचा अंदाजही त्यांनी प्राथमिक तपासणीत पोलिसांना दिला.
दरम्यान, राव हे या सर्व पाहणीचा तसेच इमारतीच्या बांधकामसंबंधीचा अहवाल येत्या आठ दिवसांत पोलिसांना सादर करणार आहेत. आरोपींना शिक्षा होण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा पुरावा होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा