‘व्हिवा लाउंज’मध्ये मंगळ मोहिमेतील शास्त्रज्ञ मीनल रोहित यांच्याशी संवादसंधी
स्वतभोवती गूढतेची कडी लपेटून घेणारा आणि सामान्यांपासून खगोलशास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या मंगळ या ग्रहाबाबत अनोखा संवाद साधण्याची संधी आज, बुधवारी मिळणार आहे. या ग्रहाबाबतची अधिकाधिक माहिती जाणून घेण्याच्या मानवी प्रयनांना हातभार लावणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञ मीनल रोहित या ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या नव्या पर्वात अंतराळविश्वात माणसाने मांडलेला हा संशोधनडाव उलगडून दाखवणार आहेत.
भारताच्या पहिल्या मंगळमोहिमेत महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या शास्त्रज्ञ, चांद्रयान-२ सारख्या मोठय़ा अंतराळ मोहिमांच्या प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या अभियंत्या आणि पहिल्या टेलिमेडिसिन नेटवर्कसाठी योगदान देणाऱ्या तज्ज्ञ अशी मीनल रोहित यांची ओळख आहे. त्या गेली १६ वर्षे भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) असून सध्या अहमदाबादच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये कार्यरत आहेत. अंतराळ मोहिमांची आखणी, त्यांची तयारी, मंगळयानाचे स्वरूप, चांद्रयानाचे काम, अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी याविषयी मीनल यांच्याशी थेट संवाद साधता येईल. हा कार्यक्रम आज, बुधवारी दादरमध्ये होईल. मंगळयानाबरोबर पाठवण्यात आलेल्या ‘पेलोड’संदर्भातील मीनल यांचे योगदान मोठे असून स्पेस अॅप्लिकेशन सेंटरच्या इलेक्ट्रो-ऑप्टिकल इंटिग्रेशन विभागात त्या कार्यरत आहेत. अंतराळात पाठवण्याच्या उपकरणांची तांत्रिक बाजू सांभाळताना यानातील संपर्कयंत्रणा बघणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअिरगची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ‘इस्रो’मध्ये सॅटकॉम इंजिनीअर म्हणून कामाला सुरुवात केली. सध्या वरिष्ठ शास्त्रज्ञ/अभियंता या पदावर त्या कार्यरत आहेत.
- कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर पश्चिम, मुंबई.
- कधी – आज, २१ डिसेंबर
- वेळ – सायंकाळी ४.४५ वाजता