मुंबई: गर्भधारणापूर्व माता व दोन वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘वात्सल्य’ योजना आणि प्रयोगशाळा सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला देशातील नामांकित राष्ट्रीय ‘स्कॉच’ (एसकेओसीएच) पुरस्काराने दिल्लीत सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीत ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथु रंगा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, पुणे आणि अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. पी. एन गंडाळ, सहाय्यक संचालक, डॉ. उज्ज्वला कळंबे, युनिसेफ सल्लागार यांनी विभागाच्या वतीने ‘वात्सल्य’ योजनेच्या यशस्वितेसाठी व समन्वयासाठी योगदान दिले.
हेही वाचा >>>१३ वर्षांच्या मुलीला धमकावून अत्याचार
वात्सल्य कार्यक्रमाचा प्रभाव आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने या कार्यक्रमाला सन्मानित करण्यात आले आहे. शासन आणि सार्वजनिक सेवेतील उत्कृष्टतेसाठी भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक स्कॉच पुरस्कार, मोजता येण्याजोगा सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना मान्यता देतो. वात्सल्य कार्यक्रमाची मान्यता देशभरात माता आणि बाल आरोग्य हस्तक्षेपांसाठी एक मॉडेल म्हणून त्याची प्रभावीता आणि मापनक्षमता अधोरेखित करते. या राष्ट्रीय मान्यतासह, वात्सल्य कार्यक्रम हा आरोग्य सेवेतील सर्वोत्तम पद्धतींचा एक नमुना आहे, जो लक्ष्यित हस्तक्षेप आणि सामुदायिक सहभाग आरोग्य परिणामांमध्ये कसे बदल घडवू शकतो हे दाखवून दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रुग्णांना निदान करण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा सेवा कार्याची नोंद घेऊन या कार्याला सन्मानित करण्यात आले आहे.
भारताला एक चांगले आणि सक्षम राष्ट्र बनविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या लोकांना, प्रकल्पांना आणि संस्थांना स्कॉच पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर प्रदान केले जातात. समाजासाठी योगदान देणाऱ्या असामान्य कामगिरीबद्दल व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. स्कॉच पुरस्कारांची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक असून यामध्ये तज्ज्ञांकडून प्रकल्प समीक्षा, जाणकार समीक्षकाद्वारे तपासणी, फेरतपासणी, मतदान पद्धती तसेच प्रत्यक्ष सहभागींकडून मूल्यमापन अशा वेगवेगळ्या कसोट्या पार करून आलेल्या व्यक्ती वा संस्थांना पुरस्कारास पात्र समजले जाते. यात सार्वजनिक आरोग्य दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.