हिंदी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीच्या काळातील सुप्रसिद्ध छायालेखक श्रीरंग दाभोलकर (८०) यांचे नुकतेच विलेपार्ले येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘फिल्मिस्तान’ या मातबर संस्थेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या दाभोलकर यांनी १९८५मध्ये चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती घेतली होती.
देव आनंद एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी फिल्मिस्तानमध्ये आले असताना त्यांचे दाभोलकर यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी दाभोलकर यांना ‘नवकेतन’मध्ये बोलावून घेतले आणि दाभोलकर निष्णात छायालेखक फली मिस्त्री यांचे प्रमुख सहाय्यक म्हणून रुजू झाले. ‘नवकेतन’च्या ‘हम दोनों’, ‘काला पानी’, ‘काला बाजार’, ‘तेरे घर के सामने’, ‘तेरे मेरे सपने’, ‘गाइड’, ‘प्रेम पुजारी’, ‘ज्वेल थिफ’, ‘हरे राम हरे कृष्ण’, ‘हिरा पन्ना’ या चित्रपटांचे आणि इतर संस्थांच्या ‘मिस्टर नटवरलाल’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘राजपूत’, ‘राम बलराम’ या चित्रपटांचे ते मुख्य कॅमेरामन होते. ‘असेल माझा हरी’ या मराठी चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. ‘नवकेतन’च्या ‘इष्क इष्क इष्क’ या चित्रपटासाठी त्यांनी माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर रक्त गोठवणारी थंडी आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यात चित्रिकरण केले होते.

Story img Loader