मुंबई : सागरी किनारा मार्ग प्रकल्पांर्तगत दोन महाबोगदे खणण्याचे काम पूर्ण झाले असून हे बोगदे खणणारे चिनी बनावटीचे तब्बल २८०० टन वजनाचे आणि चार मजली उंच ‘मावळा’ यंत्र हटवण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन महिने लागणार आहेत. पाच मोठ्या भागात असलेल्या या यंत्राचा पुढील धारदार पात्याचा भाग हटवण्यात आला आहे.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मरिन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतच्या या मार्गाचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात आले आहेत. खास चीन येथून आणलेल्या अवाढव्य टनेल बोअरिंग यंत्राच्या (टीबीएम) साह्याने बोगदे खणण्यात आले आहेत. बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली होती. त्यानंतर पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले. १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू असताना झालेल्या बिघाडामुळे खोदकामाला उशीर झाला होता. मात्र ३० मे रोजी बोगदा खणणारे अवाढव्य धूड जमीन भेदून बाहेर आले आणि बोगदा खणण्याच्या कामाला पूर्णविराम मिळाला. बोगदा खणण्याचे काम झाले असले तरी हे यंत्र बाहेर काढून प्रकल्पस्थळावरून हटवण्यास तब्बल तीनसाडेतीन महिने लागणार आहेत.
हेही वाचा – भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका आणि स्वच्छता सेवक बेमुदत संपावर
या यंत्राचे एकूण पाच मोठे भाग असून त्यात पुढचा भाग हा जमीन कापणारा धारदार पात्यांचा आहे. त्यापाठोपाठ गोलाकार शिल्ड आणि अन्य तीन सुटे भाग आहेत. त्यापैकी पाती असलेला भाग सोमवारी बाहेर काढण्यात आला, अशी माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तर उर्वरित भाग हटवण्यास तीन – साडेतीन महिने लागणार आहेत. दरम्यान, हे यंत्र या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांच्या मालकीचे असून हे यंत्र चीनला पाठवायचे की देशात अन्य ठिकाणच्या प्रकल्पांसाठी वापरायचे याचा निर्णय संबंधित कंपनी घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
टाळेबंदीच्या काळात चीनहून आलेले हे यंत्र भूगर्भात उतरवणे मोठे आव्हान होते. हे यंत्र जमिनीत उतरवण्यासाठी कित्येक फूट खोल खणून ठेवण्यात आले होते. या यंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले. बोगदा खणणारे ‘मावळा’ यंत्र भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम यंत्र आहे. १२.१९ मीटर व्यास असणाऱ्या ‘मावळा’ यंत्राची उंची ४ मजली इमारती एवढी आहे. त्याची लांबी तब्बल ८० मीटर एवढी आहे. त्याचे वजन सुमारे २८०० टन इतके असून त्याबरोबर वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीचे वजन सुमारे ६०० टन आहे. ‘मावळा’ संयंत्राची पाती दर मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरू शकणारी आहेत.