भरसमुद्रात दोन नौकांवर काही संशयित इसम असल्याची माहिती मच्छिमारांनी दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावरील गस्तीत वाढ केली आहे. सागरी पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तटरक्षकदल तसेच नौदलालाही माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन नौकांवर सात इसम संशयास्पदरीत्या फिरत होते. ते तोडक्यामोडक्या हिंदीमध्ये बोलत होते. जेवण कुठे मिळेल, अशी विचारणा ते करीत होते, असे काही मच्छिमारांनी पोलिसांना सांगितले. याबाबत त्यांनी वडाळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी ही तक्रार लिहून घेऊन तात्काळ सागरी बंदोबस्तात वाढ केल्याचे उपायुक्त तानाजी घाडगे यांनी सांगितले.
या माहितीनंतर सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने समुद्रात गस्त घातली. मात्र त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही व्यक्ती आढळून आल्या नाहीत, असेही घाडगे यांनी सांगितले. यलोगेट, वडाळा तसेच शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गस्त वाढविण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही माहिती खोडसाळपणे दिल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही उपायुक्त घाडगे यांनी स्पष्ट केले असले तरी संबंधित मच्छिमारांनी मात्र आक्षेप घेतला आहे. आम्हाला जे आढळले ते आम्ही पोलिसांना सांगितले. त्यानंतरही पोलीस जर अशी भूमिका घेणार असतील यापुढे पोलिसांना माहिती द्यायची किंवा नाही, याचा आम्हाला विचार करावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा