मुंबई : दोन दिवसांपूर्वी जुहू समुद्रकिनाऱ्यावर दृष्टीस पडलेले समुद्री कासव अंडी न घालताच समुद्रात निघून गेल्याचा दावा सागरी संवर्धन कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमींनी केला आहे. जुहू समुद्र किनाऱ्यावर झालेल्या दाटीवाटीमुळे मादी कासव अंडी न घालताच माघारी समुद्रात गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

समुद्री कासव मादी प्रथमच जुहू समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली असावी. कासव मादी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आली त्यावेळी तेथे नागरिकांची प्रचंड गर्दी होती. किनाऱ्यावर आलेल्या कासवाला अनेकांनी हात लावण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी त्याचे कवच हाताने ठोकून पाहिले. यामुळे कासव विचलित होऊन भयभीत झाले. कासवांना अंडी घालण्यासाठी किनारा ही सुरक्षित जागा असते. मात्र अनेकांना हे माहीत नसते. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, जुहू कोळीवाडा येथील एका रहिवाशाने रात्री ९ वाजता जुहू किनाऱ्यावरील समुद्री कासवाची ध्वनिचित्रफीत पाठवली. त्यात कासव समुद्रात जाताना दिस होते. त्याला नागरिकांनी गराडा घातला होता. कदाचित या गोंधळामुळेच मादी तेथे अंडी देऊ शकली नाही. येत्या दोन – तीन दिवसांत मादी परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्सोवा किनाऱ्यावर २०१८ मध्ये समुद्री कासवाने एक घरटे बांधल्याची नोंद झाल्याचे कोस्टल कन्झर्वेशन फाउंडेशनचे मरीन इकोलॉजिस्ट शौनक मोदी यांनी सांगितले.

जुहू समुद्रकिनाऱ्यावर रात्री गस्त घालण्यात येईल. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) रक्षकांसोबत आमचे कर्मचारी तैनात करण्यात येतील. कासव परत आले तर आम्ही त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. तसेच कोणीही हस्तक्षेप केल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशाराही विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी दिला. वर्सोवा किनाऱ्यावर समुद्री कासवाची अंडी असल्याचे पर्यावरणवादी अफरोज शाह यांनी २०१८ मधील अहवालात म्हटले होते.

Story img Loader