समुद्रकिनाऱ्यावरील फेरफटक्यासोबत जलचरांची माहिती देणारी मोहीम
देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मुंबईतील विविध पर्यटनस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सिटी वॉक’सारख्या पर्यटन मोहिमेच्या धर्तीवर आता मुंबापुरीच्या सागरी संपत्तीची ओळख करून देणाऱ्या ‘सी वॉक’ मोहिमेची सुरुवात झाली आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी आढळणारे जीवजंतू, जलचर, जिवंत प्रवाळ यांचे दर्शन घडवण्यासोबत सागरी परिसंस्थेची माहिती देणाऱ्या मोहिमेसाठी मुंबईतील सागरी अभ्यासकांनी पुढाकार घेतला आहे. कफ परेड ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा ‘सी वॉक’ घेतला जाणार आहे.
मुंबईमधील पुरातन आणि ब्रिटिशकालीन वास्तूंची माहिती, शहरातील महत्त्वाचे व्यवसाय, वैशिष्टय़े, इतर ऐतिहासिक खाणाखुणा यांची माहिती करून देण्याच्या उद्देशाने अनेक अभ्यासक ‘सिटी वॉक’ घेतात. दिवसभर चालत फेरफटका मारताना या शहराशी पर्यटकांची एक प्रकारची जवळीक निर्माण होते. याच धर्तीवर आता मुंबईच्या सागरी परिसंस्थेची माहिती करून देण्यासाठी ‘सी वॉक’ हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सागरी परिसंस्थेचे अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी सांगितले.
मुंबईला कफ परेडपासून भाईंदरच्या उत्तनपर्यंत सुमारे ७० किलोमीटर इतकी विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. डॉल्फिन, शार्क , ऑलिव्ह रिडल कासवे, सन फिश, स्टिंग रे, व्हेल (देवमासा) यांसारख्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती मुंबईच्या समुद्रात आढळून येतात; परंतु किनारपट्टीवर कचरा फेकण्याच्या प्रवृत्तीमुळे किनारपट्टय़ा बकाल होऊ लागल्या असून त्यांचे पर्यटन आकर्षणही कमी झाले आहे. किनारपट्टींची ‘कचरापट्टी’ ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी ‘सी वॉक’सारख्या मोहिमेचा उपयोग होईल, असे पाताडे यांनी सांगितले.
मुंबईचे किनारे कांदळवन आणि खडकाळ असे दोन प्रकारचे आहेत. या दोन्ही पट्टय़ांत आढळणारी जीवनसंपत्ती वेगवेगळी आहे. कफ परेड ते गिरगाव चौपाटीपर्यंत समुद्रकिनारपट्टीच्या भागात सी-हॉर्स, पाइप फिश, स्टारफिश, जिवंत प्रवाळ, लॉबस्टर, खेकडे, मडस्कॅब, ऑक्टोपस, समुद्री गोगलगाईंच्या विविध प्रजाती असे जीव आढळतात. ३० एप्रिलला झालेल्या पहिल्या सीवॉकमध्ये गिरगाव चौपाटीजवळ खेकडे, मडस्कॅब, ऑक्टोपस, समुद्री गोगलगाईंच्या विविध प्रजाती पाहता आल्या. साधारण २५ जणांच्या गटाने सकाळी ओहोटीच्या वेळेत या ठिकाणी फेरफटका मारला. भविष्यात हा फेरफटका वांद्रे, माहिम आणि दादर चौपाटीवरही मारण्यात येणार आहे.
‘सागरी जीव’ फेसबुकवर
‘सी वॉक’च्या माध्यमातून दिलेल्या सागरी जीवांच्या छायाचित्रांचे संकलन ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ या फेसबुक पानावर करण्यात येते. या पानाची निर्मिती प्रदीप पाताडे यांच्यासोबत शार्क संवर्धनावर काम केलेले सिद्धार्थ चक्रवर्ती आणि अभिजित जमालाबाद यांनी केली आहे. ‘सी वॉक’मध्ये सहभागी झालेल्यांकडूनच या फेसबुक पानावर छायाचित्रे, माहिती आणि त्यांचे अनुभव लिहिले जातात.