मुंबई : पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयांना सील ठोकल्यानंतर आता या कार्यालयांबाहेरील आसनेही पालिका प्रशासनाने हटवली आहेत. पालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालय कोणाचे यावरून शिंदे गट व ठाकरे गटात झालेल्या वादविवादानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या सर्वच पक्षांची कार्यालये बंद केली.
पक्ष कार्यालये पुन्हा सुरू करावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली होती. मात्र आयुक्तांनी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे पक्ष कार्यालये बंद झाल्यापासून सर्वच पक्षाच्या या कार्यालयातील सगळे कर्मचारी दिवसभर व्हरांडय़ात बसून असतात. माजी गटनेते, माजी नगरसेवकही दालनाबाहेरच लोकांच्या भेटीगाठी घेतात.
गेल्या आठवडय़ात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी निधी वाटपाच्या विषयावरून पालिका आयुक्तांना घेराव घातला होता. त्यानंतर माजी नगरसेवकांना जमावाने येण्यास बंदी घालण्यात आली होती. तसे आदेश सुरक्षारक्षकांना देण्यात आले होते. तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून पक्ष कार्यालयाबाहेरील सर्व आसने रात्रभरात हटवण्यात आली आहेत. शनिवार, रविवार पालिकेचे मुख्यालय बंद असते. त्यामुळे शुक्रवारी ही आसने हटवण्यात आली आहेत. पुढील आठवडय़ात आयुक्तांच्या या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.