मुंबई : ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी तिन्ही बीडीडी चाळीला भेट देत पहिल्या टप्प्याच्या कामाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्याचे काम समाधानकारक असल्याचे सांगत यावेळी जयस्वाल यांनी दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना दिले.
हेही वाचा >>> एका महिन्यात मालवाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत ६१० कोटी रुपयांची भर
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत तिन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारतींची कामे सुरू आहेत. या पहिल्या टप्प्याच्या कामाचा आढावा गुरुवारी जयस्वाल यांनी घेतला. पहिल्या टप्याचे काम समाधान कारक असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचे आदेश आपण यावेळी अधिकाऱ्यांना, कंत्राटदारांना दिल्याची माहिती जयस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक अडचणी असून या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध करता येतील याचा विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.