मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील प्रवेश ५ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचे वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केले आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात करीत आहे. दरम्यान, १ ऑक्टोबरपासून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.
नवी दिल्लीतील वैद्यकीय समुपदेशन समितीकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची प्रवेश फेरी राबविण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार प्रवेशाच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात येते. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश फेरी ५ सप्टेंबर राेजी संपली. या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश करण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय, खासगी, शासकीय अनुदानित, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्यांक महाविद्यालयातील वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाला २६ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील २६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा – पदव्युत्तर आयुर्वेद, होमियोपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
हेही वाचा – मुंबई : आमचा प्रश्न… कामातील चुकांमुळे मोटरमनला सक्तीच्या निवृत्तीची शिक्षा ?
२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय भरता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १ ऑक्टोबरपासून ४ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सर्व कागदपत्रांसह प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसऱ्या फेरीमध्ये घेतलेला प्रवेश विद्यार्थ्यांना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत रद्द करता येणार आहे. तिसऱ्या फेरीला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान अर्ज नोंदणी करता येणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची एकत्रित अंतरिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत. तसेच तिसऱ्या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी त्याचा प्रवेश रद्द केल्यास त्याच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.