लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील बहुप्रतीक्षित दुसरा बोगदा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजीअलीपर्यंतची उत्तर मार्गिका सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बोगद्यातून वाहतूक सुरु करण्यात आली. या टप्प्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजीअलीपर्यंतचा प्रवास केवळ ८ मिनिटांमध्ये पूर्ण करणे शक्य होणार आहे. प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार व रविवारी या मार्गावर वाहतुकीस बंदी घालण्यात येणार आहे. दरम्यान, जुलैपर्यंत नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा टप्पा सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरु होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रकल्पातील शक्य तो हिस्सा वाहतुकीसाठी उपलब्ध करणे, वाहतुकीचा भार कमी व्हावा या हेतूने सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील मार्ग टप्प्या-टप्प्याने खुले करण्यात येत आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका ११ मार्च रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर, मुंबईकरांना दुसरा टप्पा सुरु होण्याची उत्सुकता लागली होती. अखेर सोमवारी मरीन ड्राईव्ह ते हाजीअली परिसर असा सुमारे ६.२५ किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या टप्प्यात मुंबईकरांना अमरसन्स उद्यान व हाजीअली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांच्या माध्यमातून विविध भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल.

आणखी वाचा-मुंबई : विदेशी चलन घेऊन पळून गेलेल्या आरोपीला अटक

मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने बाहेर पडता येईल. तर, अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने प्रवेश केल्यानंतर दक्षिण बाजूस मरीन ड्राइव्हकडे तर उत्तर बाजूस बॅरिस्टर रजनी पटेल चौक व वत्सलाबाई देसाई चौकाकडे जाता येईल. तसेच, मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर हाजीअली येथील आंतरमार्गिकेवरुन बॅरिस्टर रजनी पटेल चौक (लोटस जेटी परिसर) येथून पुढे वरळी, वांद्रेकडेही मार्गक्रमण करता येणे शक्य होणार आहे. मरीन ड्राईव्ह बोगदा मार्गाने हाजीअली येथील आंतरमार्गिकेवरुन वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली चौक) येथून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडेही मार्गक्रमण करता येईल. दरम्यान, उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी पुढील टप्प्यात बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता १० जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन पालिकेतर्फे करण्यात आले असून त्या दिशेने कामे सुरू आहेत.

सागरी किनारा रस्ता प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या ७० टक्के वेळेची तसेच, ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल. वाहतूक सुविधा अधिक सुकर व्हावी, यासाठी बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू करण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, या एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे.

आणखी वाचा-स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास स्थगिती द्या, आमदार रईस शेख यांची बेस्ट प्रशासनाकडे मागणी

सोमवारी एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या बोगद्यासह उत्तरवाहिनी मार्गाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

बोगद्याची वैशिष्ट्ये

१) मावळा या बोगदा खणणाऱ्या यंत्राच्या (टीबीएम) सहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगद्याची निर्मिती (व्यास १२.१९ मी.) (अंतर्गत व्यास ११ मीटर)

२) दोन्ही बाजुने वाहतुकीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे जुळा बोगदा

३) भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायूविजन प्रणाली

आणखी वाचा-मुंबई : वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास मार्गी लागणार, लवकरच आर्थिक निविदा खुल्या होणार

सोमवार, शनिवार वाहतुकीस बंदी

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बहुप्रतीक्षित उत्तर वाहिनी सोमवारी सायंकाळी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. मंगळवारपासून सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे १६ तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी नियमितपणे खुला करण्यात येणार आहे. तसेच, आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरु राहील. तर, प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी शनिवार व रविवार हे दोन दिवस संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second tunnel of the sagari kinara road project is open for passenger service mumbai print news mrj
Show comments