नाटय़ परिषदेच्या निवडणुकीच्या शिमग्यानंतरचे कवित्व अद्याप संपलेले नसून नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार नाटय़ परिषदेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रिकरणाचे फुटेज नाहीसे झाले आहे. विशेष म्हणजे ज्या कालावधीत मतपत्रिकांचा गोंधळ झाल्याचा संशय आहे, त्याच २३ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यानचे फुटेज मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील पथकाने हे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला असता ही माहिती समोर आली. या प्रकरणाची तसेच निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळ्यांच्या सूत्रधाराचा पर्दाफाशही शुक्रवारीच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाटय़ कलावंतांच्या मुखवटय़ामागचा ‘खरा चेहरा’ बाहेर आणणाऱ्या या निवडणुकीत मतपेटय़ा ठेवल्यानंतर पुढील काही दिवसांत ‘नटराज’ व ‘उत्स्फूर्त’ या दोन्ही पॅनल्सकडून मतपत्रिका भरभरून टाकण्यात आल्या होत्या. पहिले काही दिवस सीसीटीव्ही कॅमेरा मतपेटय़ांकडे रोखलेला नव्हता. मात्र या कॅमेरात नाटय़ परिषदेत शिरणाऱ्या प्रत्येकाचीच छबी टिपली जात होती. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी हा कॅमेरा मतपेटय़ांवर बसवण्यात आला. निवडणुकीत बनावट मतपत्रिका सापडल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत शिवाजी पार्क पोलिसांनी नाटय़ परिषद व यशवंत नाटय़मंदिर येथे चौकशी केली. या वेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली. मात्र या चित्रणाची फाइल खराब झाल्यामुळे त्यांना ६ फेब्रुवारीच्या आधीचे फुटेज देणे शक्य झाले नाही, असे यशवंत नाटय़ मंदिराचे व्यवस्थापक सुनील कदम यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज गायब होण्याबरोबरच नव्याने हाती आलेली माहिती म्हणजे मतपेटय़ा ठेवल्यानंतर यशवंत नाटय़ मंदिरच्या रंगभूषा दालनातून नाटय़ परिषदेकडे जाणारा दरवाजा बंद करण्यात आला नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरा नाटय़ मतपेटय़ांवर रोखला नसताना या दरवाजातून आत येऊन मतपत्रिका टाकणे सहज शक्य होते. या प्रकाराची जबाबदारी निवडणूक अधिकारी, नाटय़ परिषदेचे कर्मचारी आणि यशवंत नाटय़ मंदिराचे व्यवस्थापन यांपैकी नक्की कोणाची, हा प्रश्न आहे.
खरा सूत्रधार कोण?
या निवडणूक प्रक्रियेत १९९९ बनावट मतपत्रिका सापडल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गहाळ झालेल्या २५०० मतपत्रिकांच्या गोंधळानंतर आता या १९९९ बनावट मतपत्रिकांमागील खरा सूत्रधार कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Story img Loader