कामगारांच्या हितासाठी लढणाऱ्या पक्षांची ताकद संपली आहे, उद्धव ठाकरे हे तर केवळ ‘कागदी वाघ’ आहेत, त्यांचे लांगूलचालन करणाऱ्यांचा आपण निषेध करतो, असा भीमदेवी पवित्रा हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष शरद राव यांनी घेतला, पण शिवसेनेच्या भूमिकेमुळे मुंबईचे जनजीवन सुरळीत राहणार हे स्पष्ट झाल्यामुळेच राव यांना बंदमधून माघार घ्यावी लागली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवाय, कामगार संघटनेची गणिते आणि आगामी निवडणुकीपूर्वीचे पक्षाचे राजकारण अशा दुहेरी ‘मजबुरी’मुळे मुंबईला वेठीला धरणे या वेळी राव यांना शक्य झाले नाही, अशी राजकीय गोटातील चर्चा आहे.
‘बंद’सारखी आंदोलने मुंबईत केवळ शिवसेनेच्या इशाऱ्यावर चालतात, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. बुधवार-गुरुवारच्या ‘भारत बंद’ आंदोलनात शिवसेनेचा पाठिंबा केवळ ‘औद्योगिक बंद’ला राहील, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी कामगारांच्या लाँग मार्चमध्ये जाहीर केले, तेव्हाच मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. बंदचा प्रभाव मुंबईवर दिसला नाही, तर बंदमध्ये सहभाग म्हणजे शक्तीचे केविलवाणे प्रदर्शन ठरले असते. ते टाळण्यासाठीच माघारीचा  पर्याय राव यांनी निवडल्याचे समजते.
राव यांच्या संघटनेची मुंबईतील परिवहन सेवेवर पकड आहे. यापूर्वी रिक्षा-टॅक्सीचालकांची आंदोलने करून राव यांनी मुंबईकरांना वेठीस धरले असल्याने, मुंबईकरांची त्यांच्या संघटनेस फारशी सहानुभूती नाही. त्यामुळे पुन्हा बंदच्या निमित्ताने रिक्षा-टॅक्सी व परिवहन सेवेत अडथळे आणून मुंबईकरांना वेठीस धरल्यास उरलीसुरली सहानुभूतीही नाहीशी होईल, या भीतीचे कारणही माघारीमागे दडले असावे. शिवाय, शरद राव हे केंद्रातील युपीए सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याने बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्याच विरोधात दंड थोपटण्याची कृती पक्षाच्या हिताची नाही, असा सूज्ञ विचारही त्यांच्या माघारीमागे असू शकतो, असा जाणकारांचा होरा आहे. मुंबईला वारंवार वेठीस धरणाऱ्या आंदोलनांमुळे निवडणुकांच्या तोंडावर जनतेची सहानुभूती गमावणे पक्षाला परवडणारे नाही हे ओळखून पक्षश्रेष्ठींनीच राव यांना कानपिचक्या दिल्यामुळेच बंदबाहेर राहण्याची भूमिका राव यांना ऐनवेळी जाहीर करावी लागली, असे समजते.  

Story img Loader