लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना रुग्णांकडून होणारी मारहाण, रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या आगीच्या घटना या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील सुरक्षेचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर, तेथील अग्निसुरक्षा यंत्रणा तसेच रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारतीचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच राज्यातील सर्व वैद्यकीय, दंत वैद्यकीय, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांच्या अधिष्ठातांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारीकांना होणारी मारहाण, वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना याची दखल घेत सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील सुरक्षेचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील प्रत्येक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, ज्या भागांमध्ये सुरक्षा रक्षक कमी आहेत, तेथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- मुंबईः मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये ताडपत्री अडकल्याप्रकरणी गुन्हा

सर्वेक्षणाअंती आवश्यक सुरक्षा रक्षकांची पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयाची सुरक्षा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयांतील अग्निसुरक्षेचीही तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सध्या विविध रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकामाचा दर्जा उत्तम असल्याची खात्री होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.