लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाला देवनार कचराभूमीलगतच्या भागात भेगा पडल्याचे निदर्शनास आले असून उड्डाणपुलाच्या दुतर्फा बांधण्यात आलेले सुरक्षा कठडेही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ते नागरिकांसाठी असुरक्षित बनले आहेत. सुरक्षा कठड्यांना गेलेले तडे आणि आणि रस्त्यावरील भेगांमुळे स्थानिक रहिवाशांकडून महापालिकेच्या कामकाजाबाबत प्रश्न उभे केले जात आहेत. परिणामी, उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी खर्च केलेल्या ६५० कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ६५० कोटी रुपये खर्च करून घाटकोपर – मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपूल बांधला. त्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२१ रोजी उदघाटन करण्यात आले. सुमारे २.९ किमी लांबीच्या हा रस्ता सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांवरून चर्चेत राहिला आहे. उद्घाटनानंतर काही काळात रस्त्यावर पडलेले खड्डे, भेगा, अवजड वाहनांना घातलेली बंदी, त्यामुळे अन्य मार्गावर होणारी वाहतूक कोंडी, अपघात आदी विविध कारणांमुळे या उड्डाणपुलाच्या दर्जावर स्थानिकांकडून कायमच टीका केली जाते.

संबंधित उड्डाणपुलावर देवनार कचराभूमीच्या दिशेकडील भागात नुकतेच भेगा पडल्याचे समोर आल्याने उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवेश नसतानाही काहीच वर्षात रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेले सुरक्षा कठडे बाहेरील बाजूस कलले आहेत. त्यांनाही तडे गेल्याने सुरक्षा कठडे कुठल्याही क्षणी कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. उड्डाणपुलालगतच्या सेवामार्गावर पालिकेमार्फत मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरु असल्याने त्या भागात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षा कठड्यांना तडे गेल्याचा अंदाज ‘गोवंडी न्यू संगम वेल्फेअर संस्थे’ने व्यक्त केला.

या उड्डाणपुलावरून केवळ हलक्या वाहनांना प्रवेश दिला जातो. अवजड वाहतूक होत नसतानाही रस्त्याला भेगा आणि सुरक्षा कठड्यांना तडे गेल्यामुळे आश्चर्य केले जात आहे. अवजड वाहनांचे वजन पेलण्याची या उड्डाणपुलाची क्षमता नसावी. त्यामुळेच हेतुपरस्पर अवजड वाहनांना प्रवेश दिला जात नाही. सुरुवातीपासून बांधकामाच्या निकृष्ट दर्जाची उदाहरणे समोर आली आहेत. या उड्डाणपुलाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप न्यू संगम वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी केला आहे.

अवजड वाहनांना पालिकेचा हिरवा कंदिल पण…

  • हा उड्डाणपूल ५० किलोमीटर प्रतितास वेगाच्या वाहतुकीसाठी अनुकूल असल्याचे यंत्रणांमार्फत स्पष्ट करण्यात आले होते. या उड्डाणपुलाचे बांधकाम इंडियन रोड काँग्रेसने विहित केलेल्या मानकाप्रमाणे करण्यात आल्यामुळे हलक्या आणि अवजड वाहतुकीसाठी सक्षम आहे. मात्र, उड्डाणपुलावरील मोहिते पाटील जंक्शन येथून उच्च दाबाच्या विद्याुत तारा जात असल्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. ही बंदी हटविण्याबाबत गोवंडी न्यू संगम वेल्फेअर संस्थेने मागणी केली होती.
  • सततच्या पाठपुराव्यांनंतर २७ लाख रुपये खर्चून महाराष्ट्र राज्य विद्याुत मंडळाच्या साहाय्याने उड्डाणपुलावरील उच्च दाबाच्या तारांची उंची वाढविण्यात आली होती. त्यांनतर महापालिकेने अवजड वाहनांच्या वाहतुकीला हिरवा कंदील दिला. मात्र, वाहतूक पोलिसांकडून या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी, बैंगणवाडी आणि शिवाजी नगर जंक्शन परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. तसेच, अपघातांचे सत्रही सुरूच असते.