बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यासह २५ जणांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे वृत्त मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फेटाळले. बॉलिवूडमधील कलाकारांना सध्या पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेत कसलीही कपात करण्यात आलेली नाही, असे मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. ट्विटरवर एका वृत्तसंस्थेच्या ट्विटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.


हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम व्यक्तींना देण्यात आलेल्या संरक्षणाचा आढावा मुंबई पोलिसांनी नुकताच घेतला असून, बॉलीवूड दिग्दर्शक-निर्माता विधू विनोद चोप्रा, दिग्दर्शक राजकुमार हिराणी, दिग्दर्शक फराह खान, निर्माता अली आणि करीम मोरानी यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली असल्याची माहिती माध्यमांनी प्रसिद्ध केली. असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमीर आणि शाहरुखच्या सुरक्षेत काही दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली होती. तसेच, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना गुन्हेगारी जगतातून गेल्या वर्षी धमक्या देण्यात आल्यानंतर त्यांना संरक्षण देण्यात आले होते. मात्र, पोलिसांना घेतलेल्या आढाव्यानुसार सद्य परिस्थितील या सेलिब्रिटींना कोणताही धोका नसल्यामुळे त्यांची पोलीस सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती होती. मात्र, कोणाच्याही सुरक्षेत कपात करण्यात आलेली नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Story img Loader