मुंबईः अंधेरी चार बंगला येथील १४ वर्षांच्या मुलीला इन्स्टाग्रामवरून, तसेच उद्ववाहनातून जाता-येताना वारंवार त्रास देणाऱ्या २४ वर्षीय सुरक्षा रक्षकाला वर्सोवा पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपी २०२१ पासून पीडित मुलीला त्रास देत होता. आरोपीने नुकतीच पीडित मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी १४ वर्षांची असून आरोेपी नोव्हेंबर २०२१ पासून इन्स्टाग्रामवरून तिच्याशी संपर्क साधून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच उद््वाहनातून जाता-येताना आरोपी तिला वारंवार त्रास देत होता. पीडित मुलीने आरोपीच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नुकतीच आरोपीने पीडित मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली होती.
हेही वाचा >>>मुंबईत जूनमध्ये राष्ट्रीय आमदार संमेलनाचे आयोजन
त्यामुळे तणावाखाली आलेल्या पीडित मुलीला आईने विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ५०६ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला बुधवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचा मोबाइल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.