उस्मानीच्या पलायानंतर आता कारागृह ते न्यायालय व पुन्हा परत या प्रवासातील आरोपींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरोपींनी अशाप्रकारे पलायन करण्याची वा तसा प्रयत्न करण्याची ही पहिली घटना नसली, तरी उस्मानीसारख्या दहशतवाद्याच्या पलायनामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईतील विविध न्यायालयामंध्ये सुरू असलेल्या फौजदारी खटल्यांमधील आरोपींना आर्थर रोड, ठाणे तसेच तळोजा कारागृहात ठेवण्यात येते. आर्थर कारागृहाचा अपवाद वगळता ठाणे आणि तळोजा कारागृहातून आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी न्यायालयात आणणे ही या आरोपींसोबत असलेल्या पोलिसांसाठी तारेवरची कसरतच असते. न्यायालयात पोहोचेपर्यंत आणि न्यायालयातून कारागृहात नेण्यात येईपर्यंत आरोपीच्या सुरक्षेची जबाबदारी सशस्त्र विभागाचे पोलीस आणि कारागृहाच्या पोलिसांवर असते. या प्रवासादरम्यान आरोपीकडून पलायन करण्याची शक्यताच अधिक असल्याने आरोपींना गरज असेल तेव्हाच न्यायालयात हजर करण्याची मागणी सतत केली जाते. परंतु आरोपींतर्फे मात्र पोलिसांतर्फे या सवलतीचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत असल्याने त्यांना सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर करण्याकडे पोलिसांचा वा कारागृहाचा कल असतो.
आरोपींच्या या सुरक्षेचा मुद्दा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयातही उपस्थित करण्यात आला आहे. त्या वेळेस न्यायालयाने आरोपींची संख्या, त्या तुलनेत अपुरे पोलीस आणि मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्स्िंागद्वारे हजर करण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. एवढेच नव्हे, तर राज्य सरकारनेही सर्व कनिष्ठ न्यायालयांत ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती दिली होती. त्याच वेळी काही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याचेही सांगितले होते. त्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपींसाठी ही सुविधा उपलब्ध करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. परंतु तसे होताना दिसत नसल्याचेच उस्मानी प्रकरणामुळे दिसून येते.
दोन पोलीस निलंबित
उस्मानीसह खटल्यातील आठ आरोपींना कारागृहातून न्यायालयात आणण्यानेण्याची जबाबदारी असलेल्या पथकातील दोन अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. चोपडे तसेच उस्मानीचा ताबा असलेले साहाय्यक उपनिरीक्षक डी. देशमुख या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
अफझल उस्मानी कोण आहे?
अफझल मुतालिब उस्मानी हा उत्तर प्रदेशातील आजमगढचा रहिवाशी असून तो सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहे. अहमदाबाद आणि सुरत येथे २००८ साली घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांसाठी त्याने नवी मुंबई येथून चोरलेल्या चार गाडय़ा पुरविल्या होत्या. शिवाय त्याने अहमदाबाद येथे शासकीय रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्याने २००४ मध्ये दहशतवादाचे प्रशिक्षणही घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. गाडय़ा चोरणाऱ्या टोळीचा माग घेत असताना उस्मानीचा सुगावा लागला आणि त्याच्यासह सादिक मोहम्मद शेख, मोहम्मद आरिफ शेख, अहमद झकीर शेख आणि शेख मोहम्मद अन्सारी अशा इंडियन मुजाहिदिनच्या पाच संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. यातील सादिक हा इंडियन मुजाहिदिनचा संस्थापक सदस्य असल्याचा पोलिसांचा दावा आहे. अस्मानीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती.

Story img Loader