मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी पोलीस हद्दीत रेल्वे पोलीस तुळशीराम शिंदे आणि रेल्वे सुरक्षा दलाचा जवान मनोज कुवर सिंह यांनी एका अज्ञात व्यक्तीला पकडून त्याच्याकडून अग्निशस्त्र (पिस्तूल) व ५ जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली. त्या व्यक्तीकडून हजारो रुपये घेऊन, त्याला सोडून दिले. त्यानंतर रेल्वे पोलिसाने अग्निशस्त्र स्वतः शोधून काढल्याचा बनाव केला. मात्र सीसीटीव्ही चित्रिकरणामुळे रेल्वे पोलिसांचे बिंग फुटले. याप्रकरणी सीएसएमटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २६/११ अतिरेकी हल्ला झालेल्या सीएसएमटी परिसरात असा प्रकार घडणे, म्हणजे लाखो प्रवाशांचा जीव टांगणीला लावणे आहे.
सीएसएमटी रेल्वे पोलीस हद्दीत १९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून एक ऑटोमॅटिक पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे असे रेल्वे पोलीस शिंदे आणि मनोज कुवर सिंह यांनी जप्त केले. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल न करता हजारो रुपये घेऊन शिंदे आणि मनोज कुवर सिंह यांनी समान वाटून घेतले. त्यानंतर शिंदे याने संबंधित व्यक्तीला पिस्तूल परत न करता स्वतःकडे ठेवले. शिंदे याने सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ अग्निशस्त्र ठेवले. तर, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता शिंदे याने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात पिस्तूल सापडल्याचा बनाव रचून स्वतः तक्रारदार बनून गुन्हा दाखल केला. मात्र या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदारांच्या मदतीने सुरू केला. सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी गुन्ह्यातील तक्रारदार तुळशीराम शिंदे यांनी सांगितलेली हकीकत व सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण यात विसंगती आढळली. त्यानंतर संशयावरुन शिंदे याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह ३७ (१), (अ) १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.
हेही वाचा – मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर शुक्रवारी तातडीची सुनावणी, ‘हे’ आहे कारण
सॅण्डहर्स्ट रोड येथे पकडण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीकडे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि दोन पुंगळ्या सापडल्याची माहिती रेल्वे पोलिसांतील सूत्रांनी दिली. त्यामुळे दोन पुंगळ्याचा वापर कुठे केला आणि पाच जिवंत काडतुसे मिळाल्याने त्याचा वापर संबंधित व्यक्ती कुठे करणार होती. अज्ञात व्यक्तीचा दहशत माजवण्याचा कट होता किंवा कोणत्या गुन्ह्यात सहभाग होता का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गेले दहा दिवस याप्रकरणाचा तपास सुरू होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून संबंधित रेल्वे पोलीस या घटनेत दोषी आढळून आला. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेत गुंतलेल्या प्रत्येकाचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. – मनोज पाटील, उपायुक्त, लोहमार्ग पोलीस, मध्य रेल्वे विभाग
सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तुळशीराम शिंदे (४९) आणि रेल्वे सुरक्षा बलाचा भायखळा येथील जवान मनोज कुवर सिंह (२८) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.