समीर कर्णुक

चेंबूर, घाटकोपर स्मशानभूमीत सुरक्षा व्यवस्था अपुरी

पूर्व उपनगरातील अनेक स्मशानभूमींमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने सध्या चेंबूर, घाटकोपर येथील स्मशानभूमींमध्ये गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. स्मशानभूमीच्या आवारातच गर्दुल्ले नशा करताना पाहायला मिळतात. गर्दुल्ल्यांना हटकणाऱ्या काही स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना यामुळे मारहाणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पालिकेने स्मशानभूमींमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई शहरात सध्या १७८ स्मशानभूमी असून यातील ११६ खासगी आहेत. तर ६२ पालिकेच्या ताब्यात आहेत. या स्मशानभूमींची देखभाल मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. गेल्या काही वर्षांत पालिकेने शहरातील बऱ्याचशा स्मशानभूमींसाठी करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या स्मशानभूमींमध्ये सुरक्षेच्या नावाने बोंब आहे.

सध्या पालिकेचे प्रत्येक स्मशानभूमीत तीन पाळ्यांसाठी साधारणपणे सहा कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीवर चार ते सहा कर्मचारी काम करतात. मात्र अनेक स्मशानभूमींच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.

मुख्य वस्तीपासून लांब असलेल्या अनेक स्मशानभूमींमध्ये गर्दुल्ले नशा करण्यासाठी येतात. दिवस-रात्र या ठिकाणी या गर्दुल्ल्यांचा हैदोस असतो. अनेकदा नशा करण्यावरून त्यांच्यामध्ये वाद होत असल्याने चाकू-तलवारीने वार करत एकमेकांना गंभीर जखमी केल्याच्या घटनादेखील अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अनेकदा स्मशानभूमींमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी या गर्दुल्ल्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र आम्हालाच चाकूचा धाक दाखवून ते बिनधास्तपणे स्मशानभूमीच्या आवारात नशा करतात. त्यामुळे आम्ही त्यांना आता रोखतच नसल्याची माहिती घाटकोपरमधील एका स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने दिली. याबाबत आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार देखील केला. मात्र त्यावर काहीच झाले नाही, असा आरोप देखील या कर्मचाऱ्याने केला. पालिकेच्या आरोग्य खात्यातील स्मशानभूमी विषयीची मुख्य जबाबदारी असलेल्या डॉ. प्रणिती टिपरे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. पालिकेने स्मशानभूमीसाठी सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. मात्र ज्या स्मशानभूमीमध्ये सुरक्षारक्षकांची गरज आहे, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुरक्षारक्षक देतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. शहरातील अनेक स्मशानभूमींना संरक्षण भिंतीच नाहीत. त्यामुळे गर्दुल्ले सहजपणे आत प्रवेश करतात. कधीकधी तर नशा करण्यासाठी स्मशानभूमीतीलच सामान चोरून नेऊन विकतात. देवनार पालिका वसाहतीमध्ये तर वर्षभरापूर्वी गर्दुल्ल्यांनी मृतदेह जाळण्यासाठी उभारलेला लोखंडी सरण चोरले होते. तर आठ दिवसांपूर्वी स्मशानभूमीच्या आवारातच एका गर्दुल्ल्याने त्याच्या सहकाऱ्यावर चाकूने हल्ला केला होता.

स्मशानभूमीमध्ये सुरक्षा रक्षक असावे, या मागणीसाठी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. पालिकेच्या महासभेत देखील मी हा प्रश्न लावून धरणार आहे.

– आशा मराठे, स्थायी समिती अध्यक्ष