शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिवस आहे. या निमित्त शिवतीर्तावरील स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी सुरू आहे. तर शिंदे गटाकडून स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येस म्हणेज कालच अभिवादन करण्यात आलं. मात्र यानंतर शिवसेना(ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडल्याने आता ठाकरे आणि शिंदे गटात काहीसी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आज शिवसेना(ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी स्मृतिस्थळास अभिवादन केल्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटावर निशाणा साधला.
अरविंद सावंत म्हणाले, “शिवतीर्थावर परत या परत या बाळासाहेब परत या, अशा काळजाला भिडणाऱ्या घोषणा त्या दिवशी घुमत होत्या. लाखोंचा जनसमुदाय होता आणि आज सगळ्यात महत्त्वाचं काय, की शिवसेना प्रमुखांनी स्वीकारलेले विचार, संस्कारित केलेले विचार, त्या विचाराला सोडून जाणारी माणसं सातत्याने विचारधारेचा शब्द वापरत आहेत.”
याचबरोबर “काय विचार होता? तर मराठी माणसांना एकत्र करताना जात-पात, धर्म सोडून महाराष्ट्राच्या भूमीतील मराठी माणसांनो एकत्र या. तेव्हाचा त्यांचा हा विचार किती मोठा होता. म्हणजे त्यांनी जेव्हा असं सांगितलं होतं, की ब्राह्मण ब्राह्मणेत्तर, मराठा मराठेत्तर ९६ कुळी, ९२कुळी, उच्च-नीच, दलित-दलितेत्तर, घाटी, कोकणी अस सारे भेद गाडून मराठी म्हणून एक होवू असं आवाहन त्यांनी केलं होतं. आवाहन सांगताना आता विचारधारेची माणसं स्वत:च्या जाती सांगत बसतात. मग कुठं विचारधारा गेली, विचारधारा नसलेली माणसं जे विचारधारेचा जयघोष करत आहेत, ते पाहिलं की असं वाटतं त्यांनी या स्मृतिस्थळावर येऊच नये. कारण, मग त्यांनी स्वीकारलेली मराठीची अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्राचा स्वाभिमान हे सगळंच गेलं. तो गहाण ठेवल्या सारखा आहे आता. ” असंही सावंत यांनी म्हटलं.
याशिवाय “एवढे सगळे कारखाने गेले तरी आम्हाला लाज वाटत नाही. बेळगाव, कारवा, निपाणी, भालकी,बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी घोषणा करणारे आपण, १९६९ साली याच शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली त्या बेळगावातील मराठी माणसासाठी लढा उभारला. ६९ हुतात्मे शिवसेनेने दिले आहेत. त्याचं विस्मरण या विचारधारेवाल्यांना होतंय. २३ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात त्याची केस आहे, पण हे झोपले आहेत. कारण, भाजपा त्या विचारधारेशी सहमत नाही.” असं सुद्धा अरविंद सावंत यांनी सांगितलं.
“मग मराठी माणसावरचा अन्याय कसा, मग त्यांना कधीतरी गरबा आठवतो. ही जी नाटकं सुरू आहेत, कधीतरी आणखी काही आठवतं, की आमचं सरकार आलं आणि हिंदुंवरचं विघ्न टळलं. हे जे आहे ते भ्रम निर्माण करणारं आहे, मुलभूत मुद्य्यांना दूर नेणं आहे.” असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.