उंबरठय़ावर असलेल्या दहीहंडी उत्सवाचे वारे मुंबईतही वाहू लागले आहेत़ मानवी मनोरे रचण्याच्या सरावासाठी रात्री जागविणेही सुरू झाले आहे. या सरावाच्या काळात आणि प्रत्यक्ष दहिकाल्याच्या दिवशी अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना भाजपने ‘सुरक्ष कवच’ देऊ केले
आहे.
या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा विमा काढण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी, तसेच सरावाच्या वेळी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूमुखीही पडतात. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी भाजपने ‘दि ओरियन्टल इन्शुरन्स’ कंपनीच्या सहकार्याने ‘सुरक्षा कवच’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील विम्याची मुदत २ ते ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत असेल.
‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून स्थानिक भाजप पदाधिकारी किंवा मुंबई भाजप कार्यालय, वसंत स्मृती, तिसरा मजला, दादासाहेब फाळके मार्ग, दादर (पूर्व) येथे सादर करावीत, असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकास कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेनुसार
*    जखमी गोविंदास १५ हजार रुपये मिळतील़
*    अपंगत्व आलेल्या गोविंदास अथवा मृत्युमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांस दीड लाख रुपये मिळतील़